गेल्या दोन वर्षापासून येणार येणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित २०७ बस पुढील वर्षापर्यंत कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसपैकी विदेशी कंपनीकडून पुरवठा होणाऱ्या १२ बस येत्या महिन्यात कल्याण डोंबिवली परिसरात धावण्यासाठी सज्ज होणार आहेत. कल्याण परिसरातील प्रवाशांना केडीएमटी बसमधून प्रथमच गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली, दिवा, टिट‌वाळा येथे वाळू माफियांची २१ लाखाची वाळू उपशाची सामग्री नष्ट

लंडन येथील काॅसिस ग्रुप कंपनीकडून कल्याण डोंबिवली पालिकेला पर्यावरणस्नेही वातानुकूलित १०७ बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. भारतीय बुथेलो कंपनीकडून १०० वातानुकूलित पर्यावरणस्नेही बस येत्या वर्षभरात केडीएमटीच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. पंधराव्या वित्त आयोगाकडून कल्याण डोंबिवली पालिकेला गेल्या वर्षी १०० कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. शहर प्रदूषणमुक्त ठेवणे, पालिका हद्दीतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्था पर्यावरणस्नेही करणे या कामांसाठी पालिकेला हा निधी वापरायचा असल्याने पालिकेने आठ महिन्यांपूर्वी ई बससेवेसाठी निविदा प्रक्रिया केली होती. यासाठी चार ठेकेदार आले होते. यामधील लंडनस्थित काॅसिस ग्रुप आणि बुथेलो कंपन्यांच्या निवीदा मान्य झाल्या आहेत.
केडीएमटी म्हणजे भंगार बस असा अनेक वर्ष बसलेला शिक्का या पर्यावरणस्नेही विद्युत बसमुळे पुसून जाणार आहे. २०७ पैकी निम्म बस वातानुकूलित आहेत. काॅसिस ग्रुपकडून कडोंमपाला नऊ मीटर लांबीच्या युराबस देण्यात येणार आहेत. या बसच्या माध्यमातून पालिकेवर कोणताही खर्च नसून ठेकेदार कंपनी या बसचे परिचलन करणार आहे. किलोमीटर मागे मिळणाऱ्या उत्पन्नातून या बस आणि केडीएमटीचा गाडा चालणार आहे, असे केडीएमटी अधिकाऱ्याने सांगितले. या बस विद्युत भारित करुन मग चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे इंधन खर्च बचत होणार आहे.

हेही वाचा >>>ठाणे : खासदार विनायक राऊत, भास्कर जाधव, अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

पर्यावरणस्नेही बस केडीएमटी उपक्रमात लवकर दाखल व्हाव्यात म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, परिवहन महाव्यवस्थापक डाॅ. दीपक सावंत, उप परिवहन व्यवस्थापक संदीप भोसले यांनी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले.
काॅसिस ई मोबिलिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार पंगा यांनी सांगितले, कल्याण डोंबिवली पालिकेला १०७ ई बस पुरवठ्याचे काम आमच्या कंपनीला मिळाले आहे. शहरातील वातावरण प्रदूषण मुक्त करणे. प्रवाशांना तत्पर आणि गारेगार प्रवास उपलब्ध करुन देणे हे आमचे प्रथम कर्तव्य असेल. पर्यावरणस्नेही वातावरणसाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत असताना आम्हाला ही संधी कल्याण डोंबिवली परिसरात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे याचे समाधान वाटते.

हेही वाचा >>>ठाणे शहराच्या काही भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता

‘केडीएमटीच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही बस येण्यासाठी आम्ही अनेक महिने प्रयत्नशील होतो. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे. काॅसिस ग्रुपच्या बसमधून शून्य उत्सर्जन होणार आहे. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी या बस महत्वाच्या भूमिका बजावतील. गारेगार प्रवासाचा आनंद प्रवासी घेतील. या शहरांमध्ये पर्यावरणस्नेही बस सुरू करणारी केडीएमटी ही पहिली संस्था आहे याचा खूप आनंद आहे. लवकरात लवकर या बस केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे परिवहन महाव्यवस्थापक डाॅ. दीपक सावंत यांनी सांगितले.

Story img Loader