ठाणे : मध्य रेल्वेच्या मार्गावर गर्दीच्या वेळेत चालविण्यात येत असलेल्या वातानुकूलित लोकल प्रवाशांकडून विरोध होत असतानाच, रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सामान्य लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकल सुरू केल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट द्वारे केला आहे. ही लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी करत हे प्रकरण हाताच्या बाहेर जाण्याच्या आधी निर्णय घ्या, असा सूचक इशाराही त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर गर्दीच्या वेळेत सामान्य लोकल कमी करून त्याऐवजी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित लोकलविरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते. या प्रवाशांच्या बाजूने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडत रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्या रद्द करून त्याऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या. असे असले तरी सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेतील सर्वच वातानुकूलित लोकल बंद करून त्या इतर वेळेत चालविण्याची मागणी आव्हाड करीत आहेत. या संदर्भात त्यांनी कळवा आणि मुंब्रा भगत प्रवाशांचा बैठकाही घेतल्या होत्या.
हेही वाचा : कल्याण: लाइनमनच्या सतर्कतेमुळे टळला मध्य रेल्वेवरील अपघात
तर, मध्य रेल्वेच्या मार्गावर वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ रेल्वे प्रशासनाने 9.03 वाजता ठाणे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सामान्य लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकल सुरू केली आहे. त्यावर आव्हाड यांनी ट्वीट द्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला सूचक इशारा दिला आहे. सकाळी 9.03 वाजता ठाणे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धिमी लोकल रद्द करण्यात आली आहे.
हिच लोकल आता वातानुकूलित मध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. ती ठाणेकर कष्टकऱ्यांची आवडती लोकल होती.9.03 ची लोकल ही बरोबर 10.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचायची. ती का रद्द केली? कोणासाठी रद्द केली? काहीच कळायला मार्ग नाही. ही लोकल पूर्ववत करा अशी ठाणेकरांची मागणी आहे. प्रकरण हाताच्या बाहेर जाण्याच्या आधी निर्णय घ्या, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.