ठाणे : घोडबंदर येथील जुना टोलनाका भागात मेट्रो मार्गिकेचे गर्डर वाहून नेणाऱ्या अतिअवजड वाहनाचा अपघात झाल्याने घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर गायमुख घाट ते वाघबीळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ठाण्याहून बोरीवली, वसई, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले आहेत. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत आहे. मध्यरात्रीपासून ही वाहतूक कोंडी सुरू आहे.
घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. रविवारी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने गर्डर वाहून नेणाऱ्या ‘पूलर’ या वाहनाला जुना टोलनाका येथे अपघात झाला. वाहन अतिअवजड असल्याने दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या एका पुलर वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचे कार्य सुरू केले. सुमारे तीन तासानंतर हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.
हेही वाचा – भिवंडीत सहा वर्षीय मुलाची क्षुल्लक कारणावरून हत्या
हेही वाचा – मेट्रो कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांत साचलेले पाणी, साथीच्या आजारांचा धोका
या मार्गावरून मध्यरात्री गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. परंतु सकाळी १० नंतरही येथील वाहतूक कोंडी सुरळीत झाली नव्हती. येथील गायमुख घाट ते वाघबीळ येथील विजयनगरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे बोरीवली, वसई, विरार, मिरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांचे हाल होत आहेत.