अंबरनाथः उच्च दाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने लागलेल्या आगीत एक अवजड वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास अंबरनाथमध्ये घडली. रस्ता रूंदीकरणानंतर उंच झालेला रस्ता आणि उपरी वीज वाहिन्यांमधील कमी झालेल्या अंतर यामुळे वाहन वाहिन्यांच्या संपर्कात आले. या वाहिन्या उंच करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची असल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे. तर उपलब्ध निधीत महावितरणाने दिलेल्या प्राधान्यानुसार कामे पूर्ण केल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. दोन शासकीय यंत्रणांच्या असमन्वयात निष्पाप वाहन चालकाचा नाहक बळी गेला आहे.
मुंबई येथील विनोदकुमार सिंग (४७) शुक्रवारी कल्याण – बदलापूर राज्यमार्गावर बुवा पाडा परिसरात कोणार्क बिझनेस पार्कजवळ रस्ता चुकल्याने वळण घेत होते. त्याच वेळी रस्त्यामधील जाणाऱ्या उच्च दाब विद्युत वाहिन्यांची उंची कमी असल्याने त्यांच्या कंटेनर वाहनाला वाहिन्यांचा स्पर्श झाला. यामुळे कंटेनरच्या केबिनमध्ये विद्युत पुरवठा झाल्याने चालक सिंग गाडीतून उतरत असताना विजेचा धक्का लागून जागीच मरण पावले. या अपघातानंतर महावितरण आणि एमएमआरडीए प्रशासनाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहे. रस्त्याची ऊंची वाढल्याने उपरी वीजवाहिन्या आणि रस्त्यामधील अंतर कमी झाले आहे. उच्चदाब वीजवाहिन्यांची ऊंची वाढवण्याच्या कामबाबत महावितरणने सर्व सोपस्कार पूर्ण करून सातत्याने एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला.
मात्र फेब्रुवारी २०२० पासून हे काम एमएमआरडीएकडून प्रलंबित आहे, असा खुलासा महावितरण कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. उपरी वीजवाहिनी स्थलांतरीत करून देण्याचे एमएमआरडीएने मान्य केले होते. त्यानुसार एमएमआरडीएने जानेवारी २०२० मध्ये संस्थेची नियुक्तही केली. मात्र काम पूर्ण न झाल्याने अपघात झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप महावितरणाने एमएमआरडीएवर केला आहे. तर उपलब्ध निधीमध्ये महावितरणाने दिलेल्या प्राधान्य यादीनुसार आम्ही कामे पूर्ण केल्याचा दावा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या अपघातानंतर महावितरणने शुक्रवारी तातडीने युद्धपातळीवर या वाहिन्यांची उंची वाढवण्याचे काम पूर्ण केले. औद्योगिक आणि नागरी अशा दोन्ही वाहिन्यांवर परिणाम झाल्याने काम करावे लागल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आली. मात्र दोन प्रशासकीय यंत्रणांच्या घोळात रखडलेले काम आधीच झाले असते तर एक निष्पाप जीव वाचला असता अशी संतप्त प्रतिक्रिया आता व्यक्त होते आहे.