कल्याण – अपारंपारिक उर्जा स्रोतांचा प्रभावी वापर करा. या केंद्र शासनाच्या धोरणानुसार कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका हद्दीत मागील १३ वर्षांत नवीन इमारतींवर एक हजार ८१९ सौर उर्जेची सयंत्रे बसवून दररोज एक कोटी सात लाख ९७ हजार ८५ लीटर गरम पाणी पालिका हद्दीत तयार होत आहे. ६१ इमारतींवर सौर उर्जा सयंत्रे बसवून एक हजार किलो वॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या माध्यमातून दरवर्षी १४ लाख ६० हजार वीज युनिटची बचत होत आहे. चालू आर्थिक वर्षात दोन मेगावॅट क्षमतेचे नवीन सौर उर्जा वीज निर्मिती प्रकल्प विकासकांच्या माध्यमातून उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
सौर उर्जा स्रोतांचा कल्याण डोंबिवली पालिकेकडून प्रभावी वापर होत असल्याने देशात अशाप्रकारे सौर उर्जा जल, विज बचत करणारी कल्याण डोंबिवली पालिका ही अव्वल महापालिका ठरली आहे, असे कार्यकारी अभियंता भागवत यांनी सांगितले. नवीन इमारती उभारणाऱ्या विकासकांना २००७ पासून इमारतीवर सौर उर्जा जल सयंत्र बसविण्याची पालिकेकडून सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय या इमारतींना वापर परवाना दिला जात नाही. या निर्णयामुळे विकासकांनी एक हजार ८१९ इमारतींवर सयंत्र बसविली आहेत. या माध्यमातून एक कोटी सात लाख सौर उर्जा जल दररोज निर्माण होत आहे. या वापरामुळे घराघरात गरम पाणी करण्यासाठी लागणारी विद्युत, गॅसचा वापर कमी झाला आहे. दरवर्षी १८ कोटी वीज युनिटची बचत होत आहे. गेल्या वर्षभरात पालिका हद्दीत ६१ इमारतींवर एक मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या सयंत्रामुळे दरवर्षी १४ लाख ६० हजार वीज युनिटची बचत होत आहे. या विजेचा वापर उदवाहन, पाणी पुरवठा पंप, इमारत परिसरातील दिवे यांच्यासाठी केला जातो, असे भागवत यांनी सांगितले.
हेही वाचा – राहुल गांधी यांच्या निषेधार्थ डोंबिवलीत ब्राह्मण महासंघाकडून फलकबाजी
पालिका हद्दीत अधिकाधिक सौर उर्जेचा वापर व्हावा यासाठी विद्युत विभागाचे अभियंता भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आरखडा तयार केला आहे. चालू आर्थिक वर्षात १६ इमारतींवर सौर उर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट या माध्यमातून ठेवले आहे, असे भागवत म्हणाले. शहराच्या विविध भागांत पथनाट्याच्या माध्यमातून सौर उर्जेची महती नागरिकांना पटवून दिली जात आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये ठाण्यातील रिक्षा चालकांना गुंगीचे औषध देऊन लुटले
“ सौर उर्जेचा अधिकाधिक वापर करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. नागरिकांमध्ये पथनाट्यातून जनजागृती केली जात आहे. प्रत्येक सौर जल, विद्युत प्रकल्प सुस्थितीत चालेल असे नियोजन करण्यात येत आहे.” असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले.
प्रशांत भागवत
कार्यकारी अभियंता
विद्युत विभाग.
फोटो ओळ