नव्या धोरणानुसार ‘जैवविविधता उद्यान’ उभारणे शक्य; रेल्वे प्रशासन, वन विभागामध्ये सामंजस्य करार

रेल्वे प्रशासन आणि वन विभाग यांच्यात अलीकडेच झालेल्या एका सामंजस्य करारामुळे  तालुक्यातील आता उजाड झालेल्या एकेकाळच्या निसर्गश्रीमंत जांभूळ तळे परिसराला नव्याने संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली असली तरी सुदैवाने अंबरनाथ तालुक्यातील शेकडो एकर वनजमिनीवर अद्याप अतिक्रमणे झालेली नाहीत. शहराच्या पूर्वेकडच्या वेशीवर काकोळे तलावालगत रेल्वेच्या हद्दीत किमान चार हेक्टर जागेत असेच एक जंगल होते. मुंबई परिसरातून येथे वनभोजन करण्यासाठी पर्यटक येत होते. मात्र पुढे अर्निबध वृक्षतोडीमुळे ‘जांभूळतळे’ नावाने ओळखले जाणारे हे सदाहरित जंगल उजाड झाले. मात्र अलीकडेच रेल्वेच्या मालकीच्या जागांवर वृक्षलागवड करण्याबाबत रेल्वे प्रशासन आणि राज्याच्या वन विभागामध्ये सामंजस्य करार झाला आहे.

जांभूळ तळे परिसरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली असली तरी सुदैवाने अद्याप या जागेवर कोणतेही अतिक्रमण झालेले नाही. त्यामुळे या सामंजस्य करारानुसार अगदी तातडीने या जागेवर नव्याने वृक्षलागवड करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.

‘जीआयपी टँक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तलावातून गुरुत्वीय पद्धतीने अगदी नव्वदच्या दशकापर्यंत कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे वसाहतींना पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर मात्र या तलावातील पाणी भूमाफिया आणि टँकरमाफिया लुटून नेत होते. काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने येथे बाटलीबंद पाण्याचा रेलनीर प्रकल्प राबविला आहे.

त्यामुळे तलाव परिसर संरक्षित झाला आहे. आता नव्या सामंजस्य करारानुसार वन विभागाने तातडीने या जागेत वृक्षलागवड करावी, अशी अंबरनाथमधील पर्यावरणप्रेमींची इच्छा आहे.

या ठिकाणी पूर्वी विविध प्राणी, पक्षी आढळत होते. अगदी २००५ पर्यंत येथे बऱ्यापैकी वनसंपदा टिकून होती. पुढे मात्र एकेक करून येथील झाडे नाहीशी झाली. रेल्वेने वृक्षलागवड करण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने या ओसाड जागेत पुन्हा नंदनवन फुलविणे शक्य आहे. त्यामुळे अंबरनाथकरांना एक जैवविविधता उद्यान मिळू शकेल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास पर्यावरणप्रेमी मंडळी तयार आहेत.

डॉ. मनीषा कर्पे, पर्यावरणतज्ज्ञ

अंबरनाथच्या वेशीवर काकोळे तलावालगत उपलब्ध असणाऱ्या जागेत रेल्वे प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्याने जैवविविधता उद्यान साकारण्यास पालिका प्रशासनाची तयारी आहे.

-गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ पालिका.

रेल्वे आणि वन विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार कोणकोणत्या जागा वनीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, याची माहिती घेत आहोत. काकोळे तलावालगतची जागा रेल्वे प्रशासनाने दिल्यास त्या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या मदतीने वनीकरण करता येईल.

डॉ. चंद्रकांत शेळके, वन परिक्षेत्र अधिकारी, बदलापूर.

Story img Loader