लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस कोसळला. दुपारच्या सुमारास बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यापूर्वी ढग दाटून आल्याने भर दुपारी अंधार पडून रात्र झाल्याचा भास होत होता. आणखी आठवडाभर असाच मान्सूमोत्तर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मान्सूमोत्तर पाऊस कोसळतो आहे. गेल्या आठवडाभरापासून या पावसाचे थैमान पहायला मिळाले आहे. उत्तर पूर्व मान्सूनमुळे पडणाऱ्या या पावसामुळे नवरात्रोत्सवातही अडथळा आला होता. त्यानंतर रविवारी हवामान खात्याने पुढचे तीन दिवस असाच पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. रविवारीही दुपारनंतर पाऊस बरसरला. तर गेल्या आठवड्यात मुरबाड भागात अशाच प्रकारे मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यात आता सोमवारीही दुपारनंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये तुफान पाऊस झाला.

आणखी वाचा-कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या

दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यानंतर चारच्या सुमारास काळोख झाला आणि पावसाला सुरूवात झाली. काही भागात सोसाट्याचा वारा सुटला होता. तर विजांचा कडकडाटही होत होता. साडे साचरच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत होता. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली भागात हा पाऊस कोसळत होता. माथेरानपासून वांगणी, शेलू आणि ग्रामीण भागातही पावसाचा जोर सायंकाळी वाढला होता. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग सुमारे ५७ किलोमीटर प्रति तास वारे वाहत होते. तर या तासाभराच्या पावसात जिल्ह्यात सरासरी ३० ते ५० मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. त्यामुळे रस्त्यांवर, सखल भागात पाणी साचले होते. त्याचा फटका वाहनचालकांना बसला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली.

आणखी वाचा-डोंबिवलीत दुकानदारांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय

आणखी आठवडाभर पाऊस

उत्तर पूर्व मान्सूम आणि तामिळनाडूजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पाऊस कोसळतो आहे. आणखी आठवडाभर हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी आठवडाभर पाऊस राहण्याची शक्यता खासगी हवामान अभ्यासकांची व्यक्त केली आहे. मात्र अधून मधून पावसाची ओढही पहायला मिळेल, असेही मोडक म्हणाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to the forecast of the meteorological department heavy rain fell on monday mrj