बदलापूरः कल्याण बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या भूसंपादनात अस्तित्वात असलेल्या इमारतीचा भूसंपादन मोबदला लाटण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात मोबदला लाटणाऱ्या तथाकथित शेतकऱ्यांची बॅंक खाती गोठवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच त्यांच्या मालमत्तांची माहिती सादर करण्याच्या सूचनाही तहसिलदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात चौकशीचा फास आवळला जात असल्याचे दिसते आहे.
बदलापूर शहराच्या पूर्वेतील बेलवली परिसरात असलेल्या स्वानंद अर्णव गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेच्या दरम्यान आपल्या जागेवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अशा भूसंपादन शिक्का बसल्याची बाब संकुलातील सदस्यांच्या निदर्शनास आली होती. विशेष म्हणजे ज्या जमिन मालकांनी ही जमिन विकसीत करण्यासाठी दिली होती. त्यांनीच या जमिनीवर इमारतीचे नाव नोंदवले गेले नसल्याची बाब लक्षात आल्याने ही जमीन भूसंपादनासाठी दिली. भूसंपादन प्रक्रियेतील कोणत्याही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. ज्या जागेवर इमारत आहे ती जागा भूसंपादनासाठी कशी गेली असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला गेला. या भूसंपादन मोबदल्यापोटील २ कोटी ६६ लाख खात्यात देण्यात आले होेते. याप्रकरणी चौकशीची मागणी रहिवाशांनी केली होती.
याप्रकरणी उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी अहवाल मागवला होता. त्यानंतर आता शर्मा यांनी भूसंपादनाची रक्कम स्विकारणाऱ्या संबंधितांचे बँक खाते गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी भूसंपादन मोबदला ज्या खात्यात जमा करण्यात आला त्या बँकेला यासंदर्भात पत्र दिले आहे. तसेच संबंधित खातेधारकांच्या मालमत्तांची माहिती सादर करण्याचे आदेशही अंबरनाथचे तहसिलदार यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदा पद्धतीने भूसंपादन मोबदला लाटणाऱ्या खातेधारकांवर कारवाईचा फास प्रशासनाने आवळला आहे. विशेष म्हणजे २०२० वर्षात ज्यावेळी रेल्वे आणि भूमी अभिलेख विभागांकडून संयुक्त सर्वेक्षण केले गेले. त्यावेळी या जागेचा अहवाल निरंक नोंदवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे संयुक्त सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.
नेमके प्रकरण काय
स्वानंद अर्णव इमारतीचे क्षेत्र हे रेल्वे मार्गिकेपासून २२ मीटरच्या बाहेर आहे. जी जागा रेल्वेतर्फे भुसंपादीत झाली आहे ती सर्व्हे क्र. ४९/२/अ ची जागा आहे. त्या जागेचे मालक हे “प्राणजी गार्डन सिटी फेज १ एक्सटेंशन को. ऑप. हौ. सोसायटी” आहे. मात्र त्यामुळे रेल्वे भुसंपादन नोंद ही स्वानंद सोसायटीच्या जागेच्या सर्वेक्षण क्र. ४९/२/ब यावर झाली आहे. ती चुकीची नोंद आहे असा आरोप आहे. यामध्ये पुर्वीचे जमीन मालक यांनी मोबदला घेतला आहे. यामुळे सोसायटीच्या मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेला अडसर आला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.