लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
मीरारोड- पोलिसावर हल्ला करून आरोपी पळून गेल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली आहे. जयकुमार राठोड असे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या कार्यालयात रविवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी बेड्यांसह फरार झाला असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे.
आणखी वाचा-ठाण्यात धावत्या कारनं अचानक पेट घेतला, ७ जण थोडक्यात बचावले!
मीरा रोड येथील गुन्हे शाखेच्या इमारतीत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कार्यालय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीला हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या. बंदोबस्ताला दोन पोलीस होते. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बंदोबस्तावरील एक पोलीस कर्मचारी जेवण आणण्यासाठी गेला. जयकुमार राठोड हा पोलीस हवालदार कार्यालयात होता. ती संधी साधून आरोपींना बेडीतून हात बाहेर काढला. लोखंडी रॉडने जयकुमार राठोड यांच्या डोक्यावर हल्ला केला आणि कार्यालातून पळून गेला. राठोड यांच्या डोक्यावर तीन ठिकाणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी आधी लाईफ लाईन रुग्णालयात नेण्यात आले होते. नंतर त्यांच्या मीरा रोडच्या वोक्हार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करणारा आरोपी हा नशेबाज होता.
दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.