डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव भागातील युनियन बँकेच्या शाखेवर सन २००९ मध्ये दुपारच्या वेळेत दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी बँकेतील रोखपालाच्या दालनातील पाच लाख ८० हजाराचा ऐवज आणि एका महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज, मोबाईल लुटून नेले होते.

याप्रकरणात मानपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना अटक केली होती. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याने मोक्का न्यायालयात खटला दाखल केला होता. ठाणे येथील मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी या सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी मोक्का आरोपातून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

सुनील बाजीराव अटांगळे उर्फ सनी (५३, रा. खिडकाळी), शाम बाळासाहेब ठोंबरे (४७, रा. दावडी), किरण भालचंद्र बोरसे (५३, रा. दावडी), माणिक शामराव वाघ (४७, रा. पाथर्ली, डोंबिवली) अशी मोक्का आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी महिला वकील ॲड. आर. जी. क्षीरसागर यांंनी काम पाहिले. आरोपींतर्फे ॲड. अमोल जोशी, ॲड. सागर कोल्हे, ॲड. नितीन भुणे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

आरोपींविरुध्द शस्त्र कायदा, दरोडा, संघटित गु्न्हेगारी कायद्याने गु्न्हे दाखल करण्यात आले होते.

सरकारी वकील ॲड. क्षीरसागर यांनी न्यायालयाला सांगितले, ३ मार्च २००९ रोजी डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील युनियन बँकेत दुपारी सव्वा तीन वाजता दोन इसम हातात रिव्हाॅल्व्हर घेऊन बँकेत घुसले. त्यांनी रोखपालासह महिला, पुरूष कर्मचाऱ्यांवर रिव्हाॅल्व्हर रोखून आवाज न करण्याच्या सूचना केल्या. एका इसमाने रोखपाल दालनातील तिजोरीतील पाच लाख ८८ हजाराची रक्कम पिशवीत भरली. प्रतिभा देसाई या कर्मचाऱ्याच्या सोन्याचा ऐवज, मोबाईल हिसकावून घेतला. हा प्रकार सुरू असताना एका दरोडाखोराने बाहेरून बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेतले होते. लुट करून झाल्यावर दरोडेखोर पळून गेले होते.

हरदयाळ अटलानी यांंनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कल्याण गु्न्हे शाखेने या दरोड्याचा समांतर तपास सुरू करून सुनील अटांगळेला पहिले अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर आरोपींची नावे पुढे आली होती.

संघटितपणे हा दरोडा टाकण्यात आल्याचे सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले. आरोपींच्या वकिलांनी सरकार पक्षाचे आरोप फेटाळले आणि या गुन्ह्याविषयी आरोपींविरुध्द कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे न्यायालयाला सांगितले. कथानक रचून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यात अनेक त्रृटी आहेत आणि त्यात तथ्यांश नाही, असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले.

या दरोड्याच्या तपासात अनेक त्रृटी आहेत. आरोपींविरुध्द सबळ पुरावे उपलब्ध करण्यात तपास यंत्रणा तोकड्या पडल्या. त्यांच्यावरील मोक्काचे आरोप शाबीत होऊ शकत नाहीत, असे मत न्यायालयाने नोंदविले. याप्रकरणातील साक्षीदारांच्या जबाबात सातत्य नाही. जप्त केलेल्या ऐवजाचे मुल्यांकन केले नाही. त्यामुळे आरोपींविरुध्दचे आरोप सिध्द होत नसल्याने त्यांची या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात येत आहे.