लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या एका २० वर्षाच्या विद्यार्थ्याला मद्याच्या धुंदीत असलेल्या आठ ते १० जणांनी काही दिवसापूर्वी ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ रात्रीच्या वेळेत बेदम मारहाण केली. मारहाण करणारी आठ ते १० मुले गरीबाचापाडा भागातील रहिवासी आहेत. ती मोकाट फिरत असुनही पोलीस त्यांना अटक करत नसल्याची तक्रार पीडित मुलाच्या वडिलांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
या मारहाण प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत भोईर (२०) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वेदांत काही दिवसापूर्वी आपल्या परिचित मित्राच्या बहिणीच्या हळदी कार्यक्रमासाठी डोंबिवलीत मित्रांसमवेत दुचाकीवरून गेला होता. तेथून रात्री परत येत असताना ठाकुर्ली पुला जवळ रस्त्यावरून जात असलेला दुचाकीवरील एक मुलगा रस्त्यावर थुंकला. ती थुंकी अंगावर उडाली म्हणून वेदांतने त्याला विचारणा केली. त्याचा दुचाकीवरील तरुणाला राग आला. त्याने मद्य प्राशन केले होते. त्याने आपल्या उर्वरित आठ ते १० मित्रांना ठाकुर्ली पूल येथे बोलावून वेदांतला लाथाबुक्की, लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. वेदांत हल्लेखोरांच्या तावडीतून सुटला. पण त्याचा पाठलाग करत भागशाळा मैदान येथे हल्लेखोरांनी पुन्हा वेदांतला मारहाण केली.
आणखी वाचा-डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
मारहाणीतील काही तरुणांना वेदांत याने ओळखले आहे. अनेक दिवस उलटूनही विष्णुनगर पोलिसांनी फक्त तीन ते चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील करण मढवी आणि इतर साथीदारांना अटक करावी म्हणून वारंवार मागणी करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत. यामुळे नाराज झालेल्या तक्रारदार वेदांत यांचे वडील विजय भोईर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंंबरे यांना पत्र लिहून मुलाच्या मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत आहेत. काही शिर्डीचे साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी आहेत. पोलीस आरोपींना अटक करत नसतील तर आपण मुलाला न्याय मिळण्यासाठी पोलीस आयक्त कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणाला बसू, असा इशारा विजय भोईर यांनी दिला आहे.
गरीबाचापाडा मधील एका माजी नगरसेवकाने विजय भोईर यांना संपर्क करून मारहाण करणारी मुले आपल्या प्रभागातील भाडेकरू पध्दतीने राहत असल्याची आणि ती मुले आपली असल्याचे कळविले आहे. पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून आरोपींना अटक करावी, अशी विजय भोईर यांची मागणी आहे. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे, असे सांगितले.