अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नवोदित कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या अभिनय कट्टय़ावर रविवारी ‘काव्य संध्या’ रंगली होती. यावेळी या कलाकारांच्या अभिनयाबरोबरच कवी मनाची ओळखही या निमित्ताने रसिकांना घडली.स्वरचित तर काही दिग्गज कवींच्या कविता कट्टय़ावरील कलाकारांनी सादर केल्या. यामुळे कवितांचा पाऊसच अभिनय कट्टय़ावर बरसू लागला होता. त्या कवितांमध्ये उपस्थित रसिक गुंतून गेले. नाती या संकल्पनेवर आधारित कविता गायत्री झवर यांनी सादर केली. नाती म्हणजे नक्की काय असते. हे या कवितेतून त्यांनी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. तर जन्माला आल्यानंतर पहिले नाते हे ‘आई’शी जुळते तेच सांगण्याचा प्रयत्न आई या कवितेतून राधिका वेलणकर यांनी केला. तर वृद्ध जोडप्यांच्या शेवटच्या दिवसातील भावना व्यक्त करणारी ‘आता उरले न दिस’ हे कविता डॉ. कांचन पाटील यांनी सादर केली. जगण्याचा वेग वाढत असताना काय काय सुटत जात, काय काय तुटत जात..याचे वर्णन स्वप्निल काळे यांनी ‘४जी रेंज’ या कवितेतून केले. विज्ञानाशी नाते जोडून मानवाच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करण्याचा आयुष्यभर वसा घेतलेले शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावरील ‘विज्ञानऋषी’ ही कविता परशुराम नेहे यांनी सादर केली. राधा-कृष्णाच्या नात्यावर आधारित अभिनेत्री स्पृहा जोशी यांची ‘अधीर श्रावण’ ही कविता राधिका वेलणकर यांनी वाचून दाखवली. तर बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन वढाय वढाय’ ही कविता आरती ताथवडकर यांनी गाऊन दाखवली. काव्य संध्येच्या निमित्ताने जमलेल्या या कट्टय़ावर काव्याबरोबर अभिनयाचे दर्शनही येथे उपस्थित चिमुकल्यांनी घडवले. डॉ. कांचन पाटील यांनी मैत्रीण या कवितेचे गायन केले. त्याच वेळी संबिता दे आणि ज्ञानेश्वर दळवी या बालकलाकारांनी त्यावर अभिनय सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली. ‘फक्त एक आठवण’, ‘नास्तिक’, ‘प्रीतशेपटा’, ‘काय विचार करतोय भाऊराया’, ‘प्यार’, ‘सर’ अशा एकाहून एक सरस कविता यावेळी कट्टय़ावरील कलाकारांनी सादर केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा