कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात बेशिस्तपणे वागून प्रवासी वाहतूक करणाऱ्या, वाहतूक कोंडीत भर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ हजार रिक्षा चालकांवर गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीत कल्याण वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईतून एक कोटी ७० लाख रुपयांचा दंड रिक्षा चालकांकडून वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
हेही वाचा >>>सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार
दीड वर्षापासून कल्याण रेल्वे स्थानक भागात कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी रेल्वे स्थानक भागातील दिलीप कपोते वाहनतळ तोडण्यात आला आहे. या वाहनतळावर उभी राहणारी वाहने रेल्वे स्थानक भागातील अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जात आहेत. उड्डाण पूल उभारणी कामात रिक्षा चालक, खासगी वाहनांचा अडथळा नको म्हणून या भागातील अवजड खासगी वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीचा विचार करुन फक्त रेल्वे, टॅक्सी चालकांना रेल्वे स्थानक भागात प्रवेश देण्यात येत आहे, असे तरडे यांनी सांगितले.
अरुंद रस्ते ५५ हजार रिक्षा
कल्याण, डोंबिवलीत एकूण ५५ हजार रिक्षा आहेत. या रिक्षा उभ्या करण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये असलेल्या वाहनतळांच्या सुविधा कल्याण, डोंबिवलीत नाहीत. त्यामुळे रिक्षा रस्त्यांवर उभ्या करुन चालकांना प्रवासी वाहतूक करावी लागते. कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानका जवळ पूल उभारणीचे कामासाठी १६ ठिकाणी खोदून ठेवले आहे. अशा गजबजाटात रिक्षा चालकांनी वाहनतळ आणि परिसरातील वाहनतळांवर उभे राहून प्रवासी वाहतूक करावी अशा सूचना केल्या आहेत. तरीही अनेक चालक वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने वाहतूक करत असल्याने अशा चालकांवर आता दंडात्मक आणि परमिट निलंबनाची कारवाई वाहतूक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत केली जाणार आहे, असे तरडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले
रेल्वे स्थानक भागातील काम गतीने होण्यासाठी या भागातील वाहन वर्दळ कमी होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न पालिका अधिकारी, वाहतूक, आरटीओ अधिकारी करत आहेत. रिक्षा चालकांनी रेल्वेच्या रिक्षा वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक करावी. रस्त्यांवर उभे राहून प्रवासी वाहतूक केली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी १० वाहतूक पोलीस, फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिका कर्मचारी, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे पथक याठिकाणी तैनात आहे.
कल्याण बस आगारात राज्याच्या विविध भागातून बस येत होत्या. याशिवाय स्थानिक परिवहन सेवांच्या बस त्यामुळे कोंडीत भर पडत होती. ही कोंडी टाळण्यासाठी बस गणेशघाट दुर्गाडी आणि मुरबाड रस्त्यावरील पालिका आगारातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे तरडे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले
रिक्षा चालकांना तंबी
कल्याण बस आगारात रेल्वे स्थानकात येजा करणाऱ्या प्रवाशांना, पादचाऱ्यांना मोकळ्या रस्त्यावरुन येजा करता यावी यासाठी या भागात वाहतूक, पालिका कर्मचारी सतत तैनात असणार आहेत. आता रिक्षा चालकांनी रस्त्यांवर उभे राहून प्रवासी वाहतूक केली तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. महात्मा फुले चौक ते दीपक हाॅटेल, दीपक हाॅटेल ते पुष्पराज हाॅटेल, पुष्पराज हाॅटेल ते महात्मा फुले चौक हे रस्ते एका दिशा मार्ग करण्यात आले आहेत. मार्गिकेचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे, असे तरडे यांनी सांगितले.
” कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पश्चिम स्थानक भागात वाहन कोंडी होणार नाह यासाठी रिक्षा चालक, खासगी वाहन चालकांनी सहकार्य करावे. नियमभंग करणाऱ्या रिक्षा व अन्य वाहन चालकांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे.”-महेश तरडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कल्याण