डोंबिवली – सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर उभ्या असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या, बेशिस्तीने रस्त्यावर रिक्षा उभ्या करणारे रिक्षा चालक हे शहर वाहतुकीतील शिस्त बिघडवतात. तसेच, रात्रीच्या वेळेत डोंबिवली शहराच्या विविध भागातील रस्ते, पदपथांवर सुरू असलेल्या खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्या या टवाळखोरांचे अड्डे बनत आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील चारही पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी या बेशिस्तांविरुद्ध गेल्या दोन आठवड्याच्या कालावधीत एकूण ४० गुन्हे रिक्षा चालक, हातगाडी चालकांच्या विरुद्ध दाखल केले आहेत.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण, डोंबिवलीत दिवसा, रात्री वाहतुकीला अडथळा करून रस्ते, पदपथांवर वस्तू विक्री व्यवसाय करणारे, रस्ते अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे रामनगर पोलीस ठाणे, विष्णुनगर पोलीस ठाणे, टिळकनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलिसांनी दिवसा, रात्री कारवाई सुरू केली आहे. रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर व्यवसाय करणारे विक्रेते, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक भागात आणि शहराच्या विविध भागात रस्ते, गल्लीबोळ अडवून प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा रस्त्यात उभे करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा – पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा
या कारवाईत हातगाडीवर भाजीपाला, नारळपाणी, फळ विक्री करणारे विक्रेते यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त हातगाडीजवळ गॅस सिलिंडर, शेगडी ठेऊन त्या माध्यमातून वडापाव, दाबेली, भेळपुरी, पाणी पुरी, अंडाबुर्जी पाव, चायनिज हातगाड्या चालकांवर, आईसक्रिम विक्रेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अनेक चायनिज हातगाडीच्या बाजुला मद्य विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यापूर्वी रात्री उशिरापर्यंत हे व्यवहार सुरू असायचे. याठिकाणी रात्रीच्या वेळेत मारामाऱ्या व्हावच्या. चायनिज हातगाड्या अनेक ठिकाणी मारामारीचे अड्डे झाले होते. हे ओळखून उपायुक्त झेंडे यांनी रात्री दहा वाजल्यानंतर शहरात एकही दुकान, आस्थापना, रस्त्यावर हातगाडी दिसता कामा नये असे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – डोंबिवलीत आयरेगावमध्ये चार दुकानांमध्ये चोरी करणारा चोरटा अटकेत
या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी स्वता उपायुक्त झेंडे अचानक एखाद्या भागाला भेट देतात. तेथे काही व्यवहार सुरू असतील संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतात. ही कारवाई टाळण्यासाठी गस्तीवरील पोलिसांनी रस्ते, पदपथ अडविणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे आणि रात्री दहा वाजल्यानंतर हातगाड्या बंद होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.