कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा चंग बांधलेल्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक पोलिसांना रात्रीच्या वेळेत झाडे, झुडपे, खाडी किनारा भागात गांजा, मद्य सेवन, काही गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दररोज रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत ही छापासत्र मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. गुरुवारी रात्री ८१ गांजा, अंमली पदार्थ सेवन आणि मद्य सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
ही कारवाई मानपाडा, खडकपाडा, कोळसेवाडी, महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली. यापूर्वी रात्री आठ वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गस्ती पोलीस फक्त परिसरात फेरा मारून पुन्हा पोलीस ठाण्यात जात होते. आता गस्ती पोलिसांची पथके, पोलीस अधिकारी या गस्ती पोलिसांच्या सोबतीला फिरून आपल्या पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळेत झाडे, झुडपांचा आडोसा घेऊन, इमारती, चाळींच्या आडोशाने कोठे अड्डे सुरू आहेत का याचा तपास घेऊन त्याठिकाणी छापे टाकत आहेत. घटनास्थळी जे मद्यपी, गांजा सेवन करणारे भेटतील त्यांना आहे त्याच जागी १०० उठाबशा काढून त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
हेही वाचा – शेअर मार्केटमधील २५ वर्ष अनुभव असलेल्या डोंबिवलीकराची ३१ लाखाची फसवणूक
मागील चार वर्षाच्या कालावधीत दिवसा, रात्रीची गस्त हा प्रकारच उरला नव्हता. गुन्हेगार मोकाट सुटले होते. पोलिसांचा कोणाला धाक उरला नव्हता. कल्याणमध्ये लैंगिक अत्याचार, हत्या आणि इतर गुन्हेगाराची प्रमाण वाढले असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस उपायुक्त झेंडे यांनी शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आदेश दिले आहेत.
सामाजिक सेवेच्या नावाखाली काही दुकानदार रात्री उशिरापर्यंत आपली दुकाने उघडी ठेवतात. काही चायनिज हातगाड्या, ढाबे मालक, आईसक्रिम दुकाने चालक रात्री उशिरापर्यंत दुकाने चालू ठेवतात. याठिकाणी रात्रीच्या वेळेत गर्दी जमते. गर्दीतून अनेक वेळा वादाचे प्रकार सुरू होतात. काही चाजनिय हातगाड्या, ढाब्यांवर परवाना नसताना मद्य विकले जाते. ही सगळी दुकाने रात्री विहित वेळेत बंद झालीच पाहिजेत असा आदेश स्थानिक पोलिसांना उपायुक्तांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये घरात पेस्ट कंट्रोलसाठी आलेल्या कामगाराने केली चोरी
डोंबिवलीत अड्डा
डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा भागातील झोपड्या, राहुट्यांमध्ये रात्रीच्या वेळेत एम. डी. अंमली पदार्थाची विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत याठिकाणी अंमली पदार्थ सेवन करणारे, विक्री व्यवसायातील तस्करांची वर्दळ असते, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. नागरिक या वर्दळीने त्रस्त आहेत. पोलिसांनी छापा टाकण्याची मागणी नागरिक करत आहेत.