डोंबिवली – येथील पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या फ प्रभागातील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, पाटकर रस्ता भागातील फेरीवाल्यांवर गुरूवारी फ प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने आक्रमक कारवाई केली. फेरीवाल्यांचे निवारे, मंच, लोखंडी बाकडे तोडून साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे हा परिसर फेरीवाला मुक्त झाला आहे.
पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सर्व प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशावरून गुरूवारी सकाळी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, फेरीवाला हटाव पथक प्रमुख जयवंत चौधरी यांच्या पथकाने बाजीप्रभू चौक येथून जेसीबी, कामगारांच्या साहाय्याने फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम सुरू केली. अचानक ही आक्रमक कारवाई सुरू झाल्याने फेरीवाल्यांची पळापळ झाली.
हेही वाचा – ठाणे : दिवा स्थानकातून सीएसएमटी गाड्या सोडा, प्रवासी संघटनेची स्वाक्षरी मोहीम
जेसीबीच्या साहाय्याने फेरीवाल्यांनी पदपथ, महावितरणचे विजेचे खांब यांचा आडोसा घेऊन सामान ठेवण्यासाठी बांधलेले मंच जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आले. अनेक व्यापाऱ्यांनी पदपथ अडवून सामान ठेवण्यासाठी कठडे बांधले होते ते तोडून टाकण्यात आले. दुकानासमोरील पावसाळी निवारे तोडून टाकण्यात आले. या कारवाईने फेरीवाले रस्ते, पदपथ सोडून पळून गेल्याने अनेक महिन्यांनी प्रथमच फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणीगल्ली, बाजीप्रभू चौक परिसर फेरीवाला मुक्त झाला आहे. रस्ते, पदपथ मोकळे झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत होते. पालिकेच्या ग आणि फ प्रभागाने दररोज एकत्रितपणे अशाप्रकारची कारवाई करून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा – आता अंबरनाथमध्येही सिग्नल यंत्रणा, कल्याण बदलापूर राज्यमार्गावर तीन ठिकाणी सिग्नल
“रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये. रस्ते, पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे पाहिजेत असे आदेश आयुक्त डाॅ. जाखड यांनी दिले आहेत. आतापर्यंत फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जात होती. आता ही कारवाई अतिशय आक्रमकपणे केली जाईल.” – चंद्रकांंत जगताप, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.