कल्याण – गेल्या वीस दिवसांपासून टिटवाळा शहराच्या विविध भागात पालिकेच्या अ प्रभागाकडून बेकायदा बा्ंधकामे तोडण्याची मोहीम सुरू आहे. या सततच्या कारवाईमुळे मांडा टिटवाळा परिसरातील बेकायदा उभारणीची कामे ठप्प झाली आहेत. शुक्रवारी अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने टिटवाळा मोरया नगर भागातील बेकायदा चाळी, जोते भुईसपाट केले.

बनेली, बल्याणी, उंभार्णी, वासुंदी, मांडा परिसरातील बेकायदा चाळी जमीनदोस्त केल्यानंतर अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी आपला मोर्चा मोरया नगर परिसरात वळविला. या भागातील ५० हून अधिक चाळी, जोत्यांची बांधकामे तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.

या भागातील बेकायदा चाळींना घेतलेल्या पाण्याच्या २० हून अधिक चोरीच्या नळ जोडण्या तोडण्यात आल्या. चोरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. टिटवाळा मांडा भागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहता कामा नये. नव्याने उभी राहिलेली सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आग्रही होत्या. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी मागील वीस दिवस बेकायदा बांधकामांच्या विरुध्द दररोज कारवाई करून बेकायदा चाळी, रस्त्याला अडथळा ठरणारी ६०० बेकायदा बांधकामे भुईसपाट केली.

या सततच्या बेकायदा बांधकामांविरुध्दच्या कारवाईने भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तोडलेल्या चाळींच्या जागी पुन्हा बेकायदा चाळ, जोते उभारण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांंवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा साहाय्यक आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

टिटवाळा परिसरात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. गेल्या वीस दिवसात ८१ खोल्या, ३०९ जोते, १०४ पाण्याच्या चोरीच्या नळजोडण्या, रस्तारूंदीकरणाला बाधित ११८ खोल्या तोडण्यात आल्या आहेत. प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.

Story img Loader