लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण जवळील मलंग गडावर बेकायदा हॉटेल्स, ढाबे, टपऱ्या वाढत आहेत. या वाढत्या सुविधांमुळे गडावर बेकायदा बांधकामे, खोदकाम केल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढत होता. गेल्या महिन्यात मलंग गडावर दरडीतील दगड कोसळून एक जण मृत्यू पावला होता. हे धोके टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मलंगगडाच्या पायथ्यापासून ते गडाच्या पाच ते सहा किलोमीटर मार्गातील बेकायदा ढाबे, हॉटेल्स प्रशासनाने गुरुवारी जमीनदोस्त केले.

गुरुवारी पहाटेपासून जिल्हा प्रशासन, वन विभाग, पोलीस यांच्या उपस्थितीत या कारवाईला सुरूवात करण्यात आली. या कारवाईची कोणतीही पूर्वसूचना ढाबे, हॉटेल्स मालकांना देण्यात आली नव्हती. अन्यथा स्थानिकांचा विरोध होण्याची भीती प्रशासनाला होती. स्थानिकांना गाफील ठेऊन सहाशे कर्मचारी, पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-दागिने पाहण्यासाठी आलेल्या महिलांनी आठ लाख रुपयांचे दागिने केले लंपास

मलंग गडावर कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडावरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. जिल्ह्यातील बेकायदा ढाबे, हॉटेल्स, पानटपऱ्या यांच्यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आहेत. मलंगगड हे भाविकांचे पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी ढाबे, हॉटेल्समध्ये काही गैरप्रकार, मद्य विक्री केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शासकीय जमिनींवरील बेकायदा चाळी यावेळी तोडण्यात आल्या. महसूल, वन विभाग, अंबरनाथ, उल्हासनगर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

आणखी वाचा-डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील वस्तीमध्ये तीव्र पाणी टंचाई, रहिवाशांचे डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन

गेल्या अनेक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच कारवाई झाली नव्हती. असे स्थानिकांनी सांगितले. मलंगगड परिसरातील काही स्थानिकांनी सरकारी, वन विभागाच्या जमिनी बळकावून त्यावर हॉटेल्स, ढाबे, भाविकांच्या दर्शन मार्गात टपऱ्या सुरू करून स्वताचे व्यवसाय सुरू केले होते. या माध्यमातून शासनाला कोणत्याही प्रकारे महसुल मिळत नव्हता.

मलंगगडावरील भाविकांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणात हॉटेल्स, ढाबेही वाढत आहेत. या सुविधांसाठी पहाडावर खोदकाम केले जात होते. त्यामुळे गडाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे ही कारवाई प्रसासनाने हाती घेतल्याचे सांगण्यात येते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against illegal dhabas hotels at malanggad mrj