ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वृत्तपत्रविक्री करणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलिसांकडून कारवाई करून त्यांना तिकडून हटविले जात होते. वृत्तपत्र विक्रेत्यांविरोधात ही कारवाई थांबावी यासाठी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना, वृत्तपत्र विक्रेते आणि माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे सुरक्षा दल प्रमुख प्रताप सिंह यांना शनिवारी निवेदन दिले. तर यापुढे स्थानक परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी विक्रेत्यांना दिले. यामुळे विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका तसेच रेल्वे पोलिसांतर्फे कारवाई करून तिथून हटविण्यात येत असते. या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून स्थानक परिसरातून हटविण्यात येते. मात्र या कारवाई दरम्यान मागील काही महिन्यात रेल्वे पोलिसांकडून वृत्तपत्रविक्रेत्यांना देखील हटविण्यात आले आहे. रेल्वे स्थानक परिसरात एकूण सात वृत्तपत्रविक्रेते बसत असत. मात्र कारवाईमुळे तसेच करोनाकाळात अनेकांचा व्यवसाय बंद पडला.

हेही वाचा- ‘सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल होत आहे’; राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांची टीका

सध्या स्थानक परिसरात केवळ तीनच वृत्तपत्रविक्रेते आहे. हे विक्रेते कोणाला अडथळा ठरत नाही तसेच सकाळचे काही तासच स्थानक परिसरात असतात. यामुळे किमान त्यांच्यावर कारवाई करू नये यासाठी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेचे सरचिटणीस संतोष विचारे, विभाग प्रमुख दीपक सोंडकर, स्थानक परिसरातील वृत्तपत्रविक्रेते आणि स्थानिक माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे ठाणे रेल्वे सुरक्षा दल प्रमुख प्रताप सिंह यांना निवेदन देण्यात आले. तर यापुढे स्थानक परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी विक्रेत्यांना दिले असल्याचे संजय वाघुले यांनी सांगितले. यामुळे विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against newspaper vendors in thane railway station will stop dpj