३४ जणांवर गुन्हे दाखल, लाखो रुपयांची वाळू जप्त

वसईच्या पूर्व पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या बेकायदा वाळूउपशाविरोधात वसई तहसीलदारांनी जोरदार मोहीम उघडली आहे. या प्रकरणी तब्बल ३४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून लाखो रुपयांची चोरलेली वाळू जप्त करण्यात आली आहे.

वसईच्या पूर्व पट्टय़ात असलेल्या खाडी आणि नदी किनाऱ्यावरून राजरोसपणे वाळूचोरी होत असते. वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी या वाळूमाफियांविरोधात जोरदार कारवाई करण्यास सुरू  केली आहे. तानसा नदीच्या काठी बेकायदा मातीउपसा आणि रेतीचोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापे टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या वेळी १०० ब्रास रेती आणि ३००० ब्रास माती जप्त करण्यात आली. त्याची किंमत २४ लाख रुपये आहे.

उसगावच्या हद्दीतील तानसा नदीच्या काठीही छापा घालून ५२ ब्रास रेती आणि १२०० ब्रास माती जप्त करण्यात आली. या प्रकरणी सायवनच्या तलाठय़ांनी दिलेल्या तक्रारीनुसार १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आडणे गावातही शासकीय जागेतून माती उत्खनन केल्याचे प्रकरण समोर आले असून त्या प्रकरणातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या आरोपींमध्ये आडणे गावातील १७ तर उसगावमधील १७ जणांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांतली ही मोठी कारवाई मानली जाते. रेतीचोरी आणि माती उत्खनन सुरू असल्यास त्याचा शोध घेऊन ते थांबविण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिल्याचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले.

सात ट्रक जप्त

रेती आणि माती उत्खनन थांबविण्याबरोबरच रेतीची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार सापळा लावून ७ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १५ ब्रास रेती जप्त करून ८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Story img Loader