महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील आवारात माघी गणेशोत्सवातील कार्यक्रमात नर्तिकांवर नोटा उधळणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर यात सहभागी झालेल्या आणखी काही कर्मचारी निलंबनाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी निलंबित करण्यात आलेले कर्मचारी हे सफाई कामगार, चालक, सुरक्षा रक्षक संवर्गातील आहेत. महापालिकेत तुलनेने निम्नवर्गात काम करणारे कर्मचारी अशा प्रकारे नोटांची बरसात करतात हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निलंबित कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून ज्या अन्य नोटा उधळणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे पुढे येतील. त्या कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात येणार आहे, असे उपायुक्त संजय घरत यांनी सांगितले. अशा प्रकारचे सुमारे आठ ते दहा कर्मचारी या प्रकरणात अडकणार असल्याचे समजते.
महिन्याकाठी १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात एवढे पैसे आले कोठून, असा सवाल केला जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत चाळी, गोदामे, कौलारू घरे तोडून इमारती उभारण्याची कामे सुरू आहेत. ही कामे नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत. यात भूमाफिया आणि प्रभाग कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचे जमलेले मेतकूट लपून राहिलेले नाही. काही वाहन चालक, शिपाई, सफाई कामगार यांच्या माध्यमातून वसुलीचे मार्ग कसे सुरू असतात, हेही याआधी उघड झाले आहे. ही साखळी तयार करताना चौथ्या श्रेणीचे काही कर्मचारी स्वतचे उखळ पांढरे करून घेत असल्याचे चित्र आहे. माफियांच्या गाडय़ा पालिकेच्या आवारात उभ्या करून देण्यास काही सुरक्षा रक्षकांकडून साहाय्य मिळते. अशा प्रकारे अवैध कामांना पालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयांमधील कामगार, वाहन चालक, कर्मचारी हातभार लावत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. काही प्रभागांमधून बेकायदा बांधकामामधील ‘वसुली’साठी चतुर्थ श्रेणी कामगारांचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.
ध्वनिक्षेपकासाठी परवानगी नाही
महापालिकेच्या डोंबिवली कार्यालयात माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित नाचगाण्याच्या कार्यक्रमासाठी, तेथे लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपक यंत्रणेसाठी पोलिसांची कोणतीही परवानगी उत्सव संयोजकांनी घेतली नसल्याचे उपायुक्तांच्या अहवालात म्हटले आहे. हा कार्यक्रम रात्री दहापर्यंत बंद करणे बंधनकारक होते. तरीही तो साडेदहापर्यंत लांबला, अशी माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली. सभा मंडपासाठी नागरिकांना पालिकेची परवानगी घेण्यासाठी आग्रह करणारे पालिका अधिकारी स्वत: कसे नियम धुडकावून कार्यक्रम करतात हे उघडकीस आले आहे. रामनगर पोलीस याविषयी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निलंबित कामगार
चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, छगन देशमुख, अरुण जगताप, संतोष जाधव, कांतिलाल पाटील, राम देढे, कैलास पवार (सुरक्षा रक्षक), दामू म्हात्रे, अनिल वाल्मीकी, सुनील होडावडेकर