बदलापूरः बदलापुरात एका शाळेत मुलीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित शाळाच अनधिकृतरित्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर बदलापूर शहरात आणखी एका शाळेवर कारवाई करण्यात आली आहे. स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल असे या शाळेचे नाव असून ती अधिकृतरित्या सुरू होती. त्यामुळे त्या शाळेच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथच्या पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी मालू शिंदे यांनी याबाबत तक्रार दिली होती.

बदलापूर शहरातील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातील शाळांमधील मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने कठोर पाऊले उचलत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवल्या. त्यामुळे शाळा सुरक्षित असल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी बदलापूर शहराच्या पश्चिमेतील एका शाळेत एका विद्यार्थीनीचा शाळेतील शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आली. राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता या शाळेत अनधिकृत वर्ग भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यावेळी तालुक्यातील सर्वच अनधिकृत शाळांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अनधिकृत शाळांच्या प्रश्नावर बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल अंबरनाथच्या शिक्षणाधिकाऱ्यांची बदलीही करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही बदलापूर शहरात एक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी मालू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर शहरातील सोनिवली येथे असलेल्या स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या व्यवस्थापकांविरूद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे ही शाळा सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रतिक्रियाः या शाळेसह आणखी चार शाळांवर आम्ही कारवाई केली आहे. येत्या काही दिवसात आणखी दोन शाळांवर कारवाई केली जाणार आहे. तालुक्यातील अनधिकृत शाळांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. तर काही शाळांना शाळा बंद करण्याच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. या शाळा बंद न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. विशाल पोटेकर, शिक्षणाधिकारी, अंबरनाथ.

प्रवेश सुरू पण यादी प्रलंबितच

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध खासगी शाळांमध्ये प्रवेश सुरू झाले आहेत. शाळांकडून मोठ्या प्रमाणावर जाहिराती लावल्या जात आहेत. विविध माध्यमातून विद्यार्थांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या शाळांपैकी अनधिकृत शाळा कोणती, कोणत्या शाळेला परवानगी नाही याबाबत पालकांकडे आयुधे नाहीत. त्यामुळे अनधिकृत शाळांची यादी लवकर जाहीर केली जावी अशी मागणी होते आहे.