उपवन, मानपाडा, हिरानंदानी परिसरातील रस्त्यांवर तरुणाई बेधुंद; पोलिसांकडून कारवाईचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी मद्याच्या अमलाखाली बेधुंद होणाऱ्या तरुणाईचे दर्शन दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री हमखास दिसून येते; परंतु ठाण्यातील कमी वस्तीच्या परिसरात आतापासूनच रस्त्याच्या कडेला मद्यपाटर्य़ा रंगू लागल्याचे चित्र आहे. शहराला जोडणारे महामार्ग, लांब पल्ल्यावर असलेला गृहसंकुलाचा परिसर या ठिकाणी तरुण घोळक्यांमधून रस्त्याच्या कडेलाच मद्यपाटर्य़ा झोडत असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे. बडय़ा गृहसंकुल परिसरालगत असलेल्या पब्जजवळ मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर मद्यप्राशन करून मोठय़ा आवाजात बोलणे, भ्रमणध्वनीवर संगीत लावणे, रात्री उशिरापर्यंत वेगाने दुचाकी चालवणे असे प्रकार या तरुणांकडून वाढू लागले असून एरवी उपवन परिसरात दिसणारे हे दृश्य अलीकडे हिरानंदानी मेडोज, मानपाडा, हिरानंदानी इस्टेट अशा ठिकाणीही पाहायला मिळत आहे.

ठाणे शहरातील काही भागांत रात्री उशिरापर्यंत बिनदिक्कतपणे अमली पदार्थ विक्री होत असल्याची बाब महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी उघड केली होती. काही दिवसांपूर्वी याविषयी ठाण्यातील कलाकार मंडळींनीदेखील समाजमाध्यमाद्वारे चिंता व्यक्त केली होती. हिरानंदानी मेडोज परिसरात काही अंतरावरच पब्ज आहेत. या पब्जमधून बाहेर पडल्यावर तरुणांचा घोळका जवळच असलेल्या मुल्ला बाग परिसराकडे वळतो. रात्रीच्या वेळी या परिसरात फारशी रहदारी नसते. रस्ता मोकळा असल्याने तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेलाच बसून खुलेआम मद्यप्राशन करतात, असे या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांनी सांगितले.  मुल्ला बागेकडे जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी असल्याने तरुण-तरुणी वाहने रस्त्यावर उभी करून या भागात बेताल वर्तन करत असल्याचे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

हे अड्डे नेहमीचेच

कोलशेत पाइपलाइन परिसर, बाळकुम पाइपलाइन, ठाणे पूर्व भागातील ब्रिम्स पॅराडाइज महाविद्यालयाच्या मागचा परिसर ही ठिकाणे मद्यप्राशन आणि अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणांसाठी नित्याचीच झालेली आहेत. गायमुख परिसरातील ‘चायना क्रीक’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या खाडीजवळदेखील रात्रीच्या वेळी तरुणांचे खुलेआम मद्यप्राशन, अमली पदार्थाचे सेवन सुरू असते. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागच्या बाजूसही सायंकाळच्या वेळीदेखील तरुणांचा घोळका असतो. वेगाने दुचाकी चालवत स्टंट करत असल्याने रात्री उशिरा या भागातून चालण्यासाठीदेखील भीती वाटते, असे या परिसरात राहणाऱ्या तरुणीने सांगितले.

खाडीकिनारी नशेबाजी

ठाण्याच्या खाडी परिसरातही रात्री उशिरापर्यंत मद्यपाटर्य़ा सुरू असल्याचे दिसून येते. खाडी परिसरात इतर वेळी रहदारी असल्याने रात्री बाराच्या नंतर तरुणांचा घोळका या ठिकाणी मद्यप्राशन करत असतो, असे या भागात गावठाण संवर्धनासाठी काम करणारे कार्यकर्ते गिरीश साळगावकर यांनी सांगितले.

अमलीपदार्थ विक्री आणि रस्त्यावर होणारे मद्यप्राशन या संदर्भात कारवाई करत आहोत. शहरातील वेगवेगळ्या भागात ही कारवाई सातत्याने सुरू आहे. बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी गस्त करण्यात येत आहे. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने ही कारवाई अधिक कडक करण्यात येईल.   – संदीप भाजीभाकरे, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त