अंबरनाथः काटई ते बदलापूर या राज्यमार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम विविध टप्प्यात केले जाते आहे. मात्र या रस्त्याला अतिक्रमणांचेही ग्रहण लागले आहे. रस्त्याच्या दुतर्फा विविध टपऱ्या, दुकाने, लाकडाच्या वखारी सुरू करण्यात आल्या होत्या. या बांधकामांवर बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यात ५१ अतिक्रमणे, वाहन धुलाई केंद्रांचे कॉंक्रिटीकरण तोडले. मात्र यापूर्वीही अशा कारवाई करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही पुन्हा अतिक्रमण डोके वर काढत असल्याने यावर कायमचा उपाय शोधण्याची मागणी होते आहे.
गेल्या काही वर्षात काटई बदलापूर राज्यमार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच मार्गावरून जांभूळ येथून बारवी धरणातून सोडले जाणारे पाणी वाहून नेणाऱ्या जलावाहिन्याही आहेत. या मार्गावर गेल्या काही वर्षात नागरी वस्ती वाढली आहे. या वस्तीमुळे येथे दुकाने, आस्थापने, चाळी वाढलेल्या दिसून येतात. ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या अनेक विना परवाना बांधकामांना आश्रय मिळत असल्याचा आरोप होतो आहे. मात्र याच भागातून जाणाऱ्या लाखो लीटर पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांना अतिक्रमणांचा विळखा पडू नये अशी अपेक्षा असते. तरीही भूमिगत जलवाहिन्या आणि जमिनीवर असलेल्या भव्य वाहिन्यांना खेटूनच अतिक्रमणे उभी राहतात.
हेही वाचा >>> डोंबिवलीत देवीचापाडा स्मशानभूमी रस्त्याला बेकायदा इमारतीचा अडथळा
अशाच अतिक्रमणांवर बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५१ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यात टपऱ्या, दुकाने, लाकडाच्या वखारी, खाद्यपदार्थांची दुकाने अशा अतिक्रमणांचा समावेश होता अशी माहिती एमआयडीसीचे अभियंता आनंद गोगटे यांनी दिली आहे. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या अतिक्रमणांना हटवल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेला भाग मोकळा झाला. यापूर्वीही एमआयडीसीच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अतिक्रमणे पुन्हा नव्याने उभी राहिल्याने या कारवाईत सातत्य राखण्याचे आवाहन केले जाते आहे.
अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या
बारवी धरणआतून सोडले जाणारे पाणी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून भव्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मिरा भाईंदर, औद्योगिक वसाहतींना दिले जाते. या वाहिन्या काटई बदलापूर राज्यमार्गालगतच आहेत. येथे अनधिकृत नळ जोडण्या घेऊन पाणी चोरले जाते. त्यातील काही जोडण्या वाहन धुलाईसाठीही वापरले जाते. अशा चार जोडण्या या कारवाईत आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर काही धुलाई केंद्रांनी जलवाहिन्यांना खेटून कॉंक्रिटचा कोबा तयार केला होता. तेही एमआयडीसी प्रशासनाने तोडून टाकले.