बदलापूरः बदलापूर स्थानक परिसरात वाहतुकीचे कोणतेही फलक नसताना वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर नुकतीच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर आता शहरात वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक फलक लावल्याशिवाय कारवाई केली जाणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंग, नो पार्किंग अशा कारवाईंना तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे कारवाईच्या जाचापासून सुटका झाली असली तरी स्थानक परिसरात कोंडी वाढण्याची भीती आहे.
बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारामुळे आधीच रस्ते अरूंद राहिले असून त्यामुळे परिसर कोंडीत अडकला आहे. त्यात स्थानक परिसरात पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. जे वाहनतळ आहेत ते रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या वाहनामुळे भरून जातात. स्थानक परिसरात खरेदीसाठी येणारे ग्राहक काही मिनिटांसाठी वाहनतळाचा वापर करण्याकडे पाठ फिरवतात. अशावेळी बाजारपेठ परिसरात मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होती. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर कारवाई करून ती वाहने उचलून नेली जातात. त्यामुळे वाहनचालक आणि पोलिसांमध्ये खटके उडतात.
हेही वाचा >>>डोंबिवलीत गृह प्रकल्पाच्या उद्वाहन खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू
सध्याच्या घडीला बदलापूर स्थानक आणि बाजारपेठ परिसरा कुठे वाहने उभी करावी किंवा करू नये याचे फलक नाहीत. अशावेळी वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांकडून आक्षेप घेण्यात येत होते. त्याविरूद्ध तक्रारी वाढल्याने लोकप्रतिनिधिंच्या उपस्थितीत वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनासोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरात सुरू असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केली होती. त्यावर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे फलक लागेपर्यंत कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन येत्या १५ दिवसात शहरात वाहतूक नियमांचे फलक लावणार असल्याची माहिती नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश गोडसे यांनी दिली आहे. नो पार्किंगची कारवाई होणार नसल्याचे वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी यामुळे स्थानक परिसरात कोंडी वाढण्याची शक्यता आहे.