डोंबिवली- सात दिवसाच्या कालावधीनंतर डोंबिवलीत वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर पुन्हा वाहन तपासणी मोहीम राबवली. वाहतूक नियम, मोटार वाहन कायद्यातील नियम न पाळणाऱ्या ६२ बेशिस्त रिक्षा चालक, दुचाकी, मोटार चालकांवर कारवाई करुन पथकाने एक लाख ४५ हजारांचा दंड वसूल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली शहराच्या विविध भागात अनेक रिक्षा चालक, दुचाकी स्वार अन्य वाहन चालक वाहतूक नियमांचे पालन न करता वाहने चालवितात. त्याचा फटका अन्य वाहनांना बसून अपघात होत आहेत. अनेक रिक्षा चालक सुट्टीसाठी गावी गेले आहेत. या रिक्षा चालकांच्या रिक्षा काही शाळकरी मुले भाड्याने चालविण्यास घेऊन प्रवासी वाहतूक करतात. वाहन मालक, चालकांचे हे नियमबाह्य प्रकार निदर्शनास आल्याने सात दिवसांच्या कालावधीनंतर सोमवारी डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांनी डोंबिवलीतील टिळक चौक, दिनदयाळ चौक, विष्णुनगर मासळी बाजार भागात अचानक रिक्षा, दुचाकी तपासणी मोहीम सुरू केली. यावेळी अनेक रिक्षा चालकांकडे परवाना, अनुज्ञप्ती परवाना नव्हता. काहींकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. काही रिक्षा चालक गणवेशात नव्हते.

हेही वाचा >>>कल्याण: पर्यावरणदिनानिमित्त आदिवासी भागात मुलांकडून बिजारोपण

काही दुचाकी स्वार भरधाव वेगाने वाहन चालवून अन्य वाहन चालकांना धोका निर्माण करत होते. काही मोटार चालकांनी सुरक्षित खांदेपट्टा लावला नव्हता. अशा सर्व वाहन चालकांना बाजुला घेऊन पथकाने त्यांच्या नवीन मोटार वाहन कायद्याने दंडात्मक कारवाई केली, असे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले. एकाचवेळी १० ते १२ वाहतूक अधिकारी पाहून वाहन चालकांची तारांबळ उडत होती. पळून जाणाऱ्या वाहन चालकांना तात्काळ थांबण्याच्या सूचना केल्या जात होत्या. दर आठवड्याला पथकांकडून वाहन चालकांवर कारवाई सुरू झाल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यामुळे बेशिस्तीने वाहने चालविणाया, भंगार वाहने रस्त्यावर वाहने आणणाऱ्या चालकांना आळा बसणार आहे, असे जागरुक प्रवाशांनी सांगितले.कारवाई सुरू झाल्यानंतर सर्व बेशिस्त वाहन चालक रेल्वे स्थानक, मुख्य रस्त्यांवरुन गायब झाले होते. ही कारवाई यापुढे नियमित सुरू ठेवली जाणार आहे, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यानंतर शाळा बसची अशाच पध्दतीने तपासणी केली जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action by transport department and sub regional transport department officials against unruly drivers in dombivli amy