डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्या समोरील रेल्वे प्रवेशव्दारावर रस्त्यात रिक्षा आडव्या लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या २० हून अधिक बेशिस्त रिक्षा चालकांवर डोंबिवली वाहतूक शाखेने मंगळवार पासून कारवाई सुरू केली आहे. या चालकांना दोन हजार रुपयांपासून दंडापासून त्यांची रिक्षा जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई : दादरच्या छबीलदास शाळेत एकापाठोपाठ चार सिलिंडरचा स्फोट; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

मंगळवारी सकाळ पासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची पळापळ झाली आहे. वाहतूक नियमभंगाच्या दंडात्मक शुल्कात वाढ झाली आहे. दिवसभरात प्रवासी वाहतुकीतून भाडे कमविणाऱ्या रिक्षा चालकाने भान ठेऊन नियमभंग न करता प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन मागील सात ते आठ महिन्यांपासून डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून शहरातील रिक्षा चालकांना केले जात आहे. वाहतूक नियमभंग वाहतूक शुल्काची माहिती देण्यासाठी रिक्षा वाहनतळांवर चालक जागृती उपक्रम वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा राबविले आहेत.

हेही वाचा >>>नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधले मोबाईल फोन; बदलापुरातील पोलिसांची कामगिरी

तरीही डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर भागातील रेल्वे प्रवेशव्दाराच्या समोर रस्त्यामध्ये दोन ते तीन रांगांमध्ये रिक्षा आडव्या लावून अनेक रिक्षा चालक दररोज प्रवासी वाहतूक करतात. या भागात वाहतूक पोलीस तैनात असतात. अन्य ठिकाणची वाहन कोंडी दूर करण्यासाठी किंवा भोजनासाठी वाहतूक पोलीस गेले की त्या वेळेत रिक्षा चालक रेल्वे प्रवेशव्दारावर येऊन प्रवासी वाहतूक करत असल्याने या भागात वाहन कोंडी, रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत होता. या रिक्षा चालकांना रिक्षा बाजुला घ्या. ही रिक्षा उभी करण्याची जागा नाही असे कोणी सांगितले की ते संघटितपणे येऊन प्रवाशाला दादागिरी करतात, अशा तक्रारी आहेत.

बेशिस्तीने प्रवासी वाहतूक करणारे बहुतांशी रिक्षा चालक बेरोजगार तरुण आहेत. त्यांच्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना, बिल्ला नाही. मूळ रिक्षा मालकाची रिक्षा भाड्याने चालविण्यास घेऊन ते व्यवसाय करतात. काही रिक्षा चालक मुरबाड भागातून येऊन डोंबिवलीत व्यवसाय करतात. झटपट प्रवासी मिळाले पाहिजेत म्हणून हे रिक्षा चालक वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करण्यावर भर देतात, असे रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालकांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे: दुकानावर मराठी पाटी नसलेल्या १५३ व्यापाऱ्यांवर कारवाई; १५ दुकान मालकांना साडेतीन लाख रुपयांचा दंड

धडक कारवाई
नियमित सूचना, आवाहन करुनही रिक्षा चालक वाहनतळ सोडून रेल्वे प्रवेशव्दारावरावर उभे राहून प्रवासी वाहतूक करत असल्याने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी विष्णुनगर भागातील रस्त्यावर, रेल्वे प्रवेशव्दार अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी हवालदार बाळासाहेब होरे, विकास सोनार, संजय थोरात, वाहतूक सेवक शिवाजी बागल यांचे कारवाई पथक तयार केले. या पथकाने मंगळवारी दिवसभरात २० हून अधिक रिक्षा चालकांना रस्त्यावर उभे राहून प्रवासी वाहतूक केली म्हणून ५०० रुपये दंड आणि चालकाने गणवेश घातला नव्हता म्हणून पंधराशे रुपये दंड ठोठावला. वारंवार सांगुनही रस्त्यावर उभे राहून वाहतुकीला अडथळा केला म्हणून या रिक्षा जप्तीची कारवाई केली. वाहतूक विभागाच्या या आक्रमक कारवाईमुळे डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलीस या भागात तैनात होते.

हेही वाचा >>>बेकायदा बांधकाम प्रकरण तापले; डोंबिवलीतील ४० भूमाफियांची बँक खाती गोठवली; तपास पथकाचा दणका

कारवाई झालेल्या रिक्षा चालकांना दंड आकारुन त्यांना समज देण्यात येईल. हे रिक्षा चालक पुन्हा रस्ता, रेल्वे प्रवेशव्दारावर आढळून आले तर त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्याचा विचार वाहतूक विभागाने सुरू केला असल्याचे कळते. बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई सुरू झाल्याने रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नियमित कारवाई
डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात रेल्वे प्रवेशद्वार, रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर नियमित कारवाई केली जाणार आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी चालकांनी रिक्षा वाहनतळावरुन व्यवसाय करावा, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action for confiscation of fines against more than 20 rickshaw drivers amy