नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करताना अनेक वाहन चालक, मालक मद्यपान करुन वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. हा धोका ओळखून कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी पहाटे एक वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात वाहन तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत ७०० हून अधिक वाहने तपासण्यात आली. यावेळी ५० हून अधिक वाहन चालक दारु पिऊन वाहन चालवित असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
हेही वाचा- ठाणे : मुंब्रामध्ये दोन दिवसांत दोघांची हत्या तर एकजण गंभीर
या सर्व वाहन चालकांवर दंडात्मक आणि न्यायालयीन हजेरीची कारवाई करण्यात आली. ५० तळीरामांनी न्यायालयात हजर राहून दंडात्मक रक्कम आणि पु्न्हा असा प्रकार करणार नाही असे सत्य प्रतिज्ञापत्र दिले नाही तर, तीन महिने वाहन चालकाचा परवाना (लायसन्स) रद्द, १० हजार रुपये दंड आणि दंड भरण्यास असमर्थता दर्शवली तर न्यायालयीन कोठडी चालकांना होईल, असे कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.
नववर्षाचा पूर्व संध्येला वाहतूक विभागाने विशेष वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे, असा एक संदेश चालकांमध्ये जावा हाही या तपासणी मोहिमेचा भाग आहे. वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी कल्याण, डोंबिवलीतील वरिष्ठांना अचानक वाहन तपासणीचे आदेश गुरुवारी रात्री दिले. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे रवींद्र क्षीरसागर यांनी ३० वाहतूक पोलीसांच्या साहाय्याने, कल्याण पश्चिम वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी १७ वाहतूक पोलीस आणि डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ एन. के. चव्हाण यांनी १६ सहकाऱ्यांच्या मदतीने गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी पहाटे एक वाजेपर्यंत चार तास वाहन तपासणी मोहीम आपल्या हद्दीत राबवली. अचानक तपासणी मोहीम सुरू झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. कल्याणमध्ये एकूण ४४ जण रात्रीच्या वेळेत दुचाकी, चारचाकी, ट्रक दारु पिऊन चालवित असल्याचे पोलीस तपासणीत उघड झाले. त्यांना तात्काळ दंड आणि न्यायालयीन कारवाई करण्यात आली.
हेही वाचा- डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकला मद्यपी, श्वानांचा विळखा
कल्याण पश्चिमेत दुर्गाडी, खडकपाडा, शहाड परिसरात एकूण २६६ वाहनांची तपासणी, कोळसेवाडी विभागात २७८ वाहने आणि डोंबिवली विभागात १३५ वाहनांची तपासणी करण्यात आली. बेशिस्तीने वाहन चालविणे, रिक्षा चालविताना गणवेश न घालणे, भोंगा वाजविणे, वाहनाची कागदपत्रे सोबत नसणे अशा वाहन चालकांकडून तिन्ही विभागातून एकूण सुमारे दोन लाख ३० हजार रुपयांचा दंड वाहतूक अधिकाऱ्यांनी चालकांकडून वसूल केला.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी, गांधारे पूल, खडकपाडा, गणेशघाट, शहाड, उल्हास खाडी किनारा भागात शनिवारी पहाटेपर्यंत विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे, असे तरडे यांनी सांगितले. कल्याण-शिळफाटा रस्ता, काटई चौक, नेवाळी नाका, विठ्ठलवाडी, मलंगरोड भागात अधिक संख्येने ढाबे, हाॅटेल्स असल्याने नववर्ष स्वागतासाठी नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली जाणार आहे, असे कोळसेवाडी विभागाचे क्षीरसागर यांनी सांगितले. डोंबिवलीत गणेशघाट, कोपर, गणेशनगर घाट भागात वाहन तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा- अंबरनाथः दोन कार अपघातात एकाचा मृत्यू एका चालकाची डुलकी, तर दुसऱ्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात
“ नववर्ष स्वागताचा आनंद प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणचे सर्व नियम पाळून करावा. वाहन चालविताना मद्यपान करू नये. आपल्यामुळे कुणाला अपघात, दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. या उद्देशातून ही विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.