रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये. तसेच नागरिकांना चालताना पदपथ, रस्ते मोकळे असले पाहिजेत, असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त ई. रवींद्रन यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई हाती घेण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ, रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या ग आणि फ प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने फेरीवाला हटाव विभागाचे पथक प्रमुख संजय साबळे यांनी ही कारवाई सुरू केली आहे. पाटकर, डॉ. रॉथ रस्त्यावरील पदपथांवर फेरीवाल्यांनी कब्जा केला होता. सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी फेरीवाले ठाण मांडून बसत असल्यामुळे प्रवाशांना स्थानकात शिरताना नाकीनऊ येत होते. बाजीप्रभू चौक भागातील चिमणी गल्ल्या भाजी विक्रेत्यांनी अडवून ठेवल्या आहेत. बाजीप्रभू चौक फळ, फूल विक्रेत्यांनी गजबजून गेले आहेत. उर्सेकरवाडीमधील गल्ल्या, राजाजी पथ, वाहतूक पोलीस कार्यालयासमोरील रस्ते फेरीवाल्यांनी अडून ठेवले आहेत.
महापालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे फेरीवाले असूनही या फेरीवाल्यांना अभय असल्याचे चित्र होते. कामत औषध दुकाना समोरील ४० ते ५० फेरीवाले तर पाच फुटांच्या पदपथावर लोखंडी टेबल टाकून व्यवसाय करीत होते. या पदपथावरून नागरिकांना चालणे अवघड होते. महिलांची या पदपथावरून चालताना सर्वाधिक त्रास होत असे.
अनेक महिलांनी हे फेरीवाले हटवण्याची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु, गेल्या पाच वर्षांत पालिका अधिकाऱ्यांनी कधी फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई केली नव्हती. आयुक्त रवींद्रन यांनी रस्ते, पदपथ मोकळे करण्याचे आदेश दिल्याने प्रभाग अधिकारी कामाला लागले आहेत.