डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील आयरे भागातील दिवा-वसई रेल्वे मार्गाजवळ होडी बंगल्याच्या बाजुची एका विकासकाने बांधलेली सात माळ्याची बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी रामनगर पोलिसांच्या बंदोबस्तात तोडकाम पथकाच्या साहाय्याने सुरू केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोंबिवलीत भुईसपाट करण्यात येणारी ही पहिली बेकायदा इमारत आहे.
आयरे भागातील साईनाथ झोपडपट्टी समोर होडी बंगल्याच्या बाजुला दिवा-वसई रेल्वे मार्गाजवळ कृष्णा मढवी या विकासकाने या बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे. या बेकायदा इमारतीकडे जाण्यासाठी पोहच रस्ता नाही. जेसीबी, पोकलने, अग्निशमन वाहन जाईल एवढ्या रूंदीचा रस्ता नाही. अशा अडगळीच्या जागेत या बेकायदा इमारतीची उभारणी विकासकाने केली आहे. पालिकेच्या ग प्रभागाच्या तोडकाम पथकाने हातोडे, घण आणि क्रॅकर मशिनच्या साहाय्याने इमारत तोडकामाला सुरूवात केली आहे.
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभागातील रहिवास मुक्त असलेल्या बेकायदा इमारती प्राधान्याने तोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे आयुक्त डाॅ. जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी कृष्णा मढवी यांची बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
विकासक कृष्णा मढवी यांच्या या बेकायदा इमारतीवर नोव्हेंबर २०२१, मे २०२२ आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये पालिकेच्या ग प्रभागाकडून तोडकामाची कारवाई करण्यात आली होती. तोडलेला भाग पुन्हा जोडून मढवी यांनी इमारत वेळोवेळी सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला. ग प्रभागाच्या अभिलेखावर ही इमारत अनधिकृत म्हणून घोषित आहे. ही बेकायदा इमारत रहिवास मुक्त आहे. त्यामुळे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी शुक्रवारपासून हातोडा, घण, क्रॅकर यंत्राच्या साहाय्याने तोडकाम पथकाच्या मदतीने ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे.
या बेकायदा इमारतीवर कारवाई सुरू झाल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. ग प्रभागात ६५ महारेरा प्रकरणातील एकूण नऊ इमारती आहेत. महारेरातील नऊ इमारतींमधील रहिवाशांना न्यायालय आणि प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत, असे कुमावत यांनी सांगितले.
ग प्रभागात आयरे हद्दीत दिवा-वसई रेल्वे मार्गाजवळ विकासक कृष्णा मढवी यांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. आयुक्तांनी रहिवास मुक्त इमारती तोडण्याचे आदेश दिल्याने ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. – संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.