डोंबिवली – येथील पश्चिमेतील कोपर गाव हद्दीतील चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील बाजूस दोन महिन्यांपासून काही बांधकामधारक कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, रस्ता अडवून एका बेकायदा बांधकामाची उभारणी करत होते. यासंदर्भात तक्रारदाराने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशावरून बुधवारपासून ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सुरू केली.
डोंबिवली पश्चिमेत चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागे अधिकृत कृष्णा संकुलाच्या बाजुला तीन महिन्यांपासून बांधकामधारकांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता, एका बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली होती. या बेकायदा इमारतीच्या तक्रारी तक्रारदार विनोद जोशी यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधुत तावडे, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केल्या होत्या. आयुक्त डाॅ. जाखड यांनी विहित कार्यवाही करून हे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी या बांधकामाच्या विकासकांना तातडीने बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती.
हेही वाचा – डोंबिवलीत फडके रोडवरील वाहन कोंडीने प्रवासी त्रस्त
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणि अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त झाल्याने या बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिका अधिकाऱ्यांना शक्य झाले नव्हते. पालिकेचा स्थगिती आदेश असताना बांधकामधारकांनी इमारतीचे काम सुरूच ठेवले असल्याची माहिती तक्रारदार जोशी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिली होती. निवडणूक संपताच तक्रारदार जोशी यांनी पुन्हा अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त तावडे यांची भेट घेऊन कोपर येथील बेकायदा इमारतीवर कारवाईची मागणी केली.
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी तातडीने कोपरचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. आयुक्त, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त सावंत यांनी बुधवारपासून तळ अधिक एक मजल्याची नव्याने उभी राहत असलेली बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले. अतिक्रमण, फेरीवाला नियंत्रण पथकाचे कामगार, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सुरू करण्यात आली. बुधवारी या बेकायदा इमारतीचा काही भाग तोडल्यानंतर गुरुवारीही इमारतीचा उर्वरित भाग तोडण्याची मोहीम साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सुरू ठेवली आहे. या इमारतीवर थातुरमातूर कारवाई न करता, ही इमारत भुईसपाट करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार जोशी यांनी केली आहे.
–
कोपर येथील चरू बामा म्हात्रे शाळेमागील नव्याने उभी राहत असलेली एक बेकायदा इमारत तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू केले आहे. या बांधकामाला यापूर्वीच स्थगितीचे आदेश दिले होते. आयुक्त डाॅ. जाखड, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून ही इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.