|| सागर नरेकर
पाटबंधारे विभागाकडून कारवाईसाठी हालचाली
उल्हास आणि बारवी नदीतून होत असलेल्या अवैध पाणी उपशावर कारवाईसाठी पाटबंधारे विभागात हालचाली सुरू झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यात घट झाल्याने जिल्ह्यातल्या अनेक शहरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत असतानाच नदीकिनारी असलेल्या धनदांडग्यांकडून अवैध पाणी उपसा केला जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. अंबरनाथ तहसील कार्यालयानेही अशा रिसॉर्ट आणि फार्म हाऊ स मालकांना नोटीस देण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे पाणीचोरांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या वर्षांत ऑगस्ट महिन्यातच पावसाने पाठ फिरवल्याने जलस्रोतांत वर्षभरासाठी आवश्यक असलेले पाणीही जमा होऊ शकलेले नाही. त्यामुळे जूनपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाटबंधारे विभागाने एमआयडीसी, जीवन प्राधिकरणाच्या मदतीने ३० तासांची पाणी कपात लागू केली आहे.
त्यात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात रविवारी मध्यरात्रीपासून ते मंगळवारी पहाटेपर्यंत पाणी उचल थांबवण्यात येत असल्याने नागरिकांना तीन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी उल्हास आणि बारवी नदीच्या किनारी कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण भागातील रिसॉर्ट आणि शेतघरांकडून थेट नदीतून अवैधरीत्या पाणी उचलण्यात येत आहे. तरणतलाव, पाण्याचे खेळ, कृत्रिम धबधबे अशा गोष्टींसाठी लाखो लिटर पाणी चोरून वापरण्यात येत आहे. याकडे पाटबंधारे विभाग आणि इतर शासकीय संस्थांचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर पाटबंधारे विभागाने हा उपसा रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पाटबंधारे विभागातील वरिष्ठ पातळीवरच्या सूत्रांनी याची गंभीर दखल घेतल्याचे कळते. स्थानिक तहसील कार्यालयाच्या मदतीने कशा प्रकारे कारवाई करता येईल याची आता चाचपणी सुरू आहे. त्यामुळे उल्हास आणि बारवी नदीकिनारी अवैध पाणी उपसा करणाऱ्या रिसॉर्ट आणि शेतघरांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
तहसील कार्यालयही नोटिसा बजावणार
अवैध पाणी उपसा करीत असल्याच्या कारणावरून भिवंडी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने आपले विशेष अधिकार वापरून अवैध पाणी उपसा करणाऱ्या रिसॉर्टवर कारवाई केली होती. त्यामुळे अंबरनाथ तहसील कार्यालयावर कारवाई का करीत नाही, असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता अंबरनाथ तहसील कार्यालयानेही स्पष्टीकरण दिले असून सिंचन उपसा सोडून अशा उपसा करणाऱ्यांना लवकरच नोटीस देण्यात येणार असल्याचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले आहे.