सुरवसे यांची नियंत्रण कक्षात बदली, तर उपनिरीक्षकाचे निलंबन
ठाणे येथील तीन पेट्रोल पंप भागातील जय श्रीकृष्णा (अँटिक पॅलेस) या ऑर्केस्ट्रा बारवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे बारमधील गैरकृत्य उजेडात आले होते. मात्र याच कारवाईमुळे अडचणीत आलेले नौपाडय़ाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. डी. सुरवसे यांची नियंत्रण कक्षात तातडीने बदली करण्यात आली आहे, तर एका पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या या कारवाईमुळे आयुक्तालय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे येथील तीन पेट्रोल पंप भागात जय श्रीकृष्णा (अँटिक पॅलेस) ऑर्केस्ट्रा बार आहे. तेथे नियमापेक्षा अधिक महिलांना कामाला ठेवले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख आणि त्यांच्या पथकाने २५ जानेवारी रोजी रात्री बारवर धाड टाकली होती. त्यामध्ये १४ महिला बारमध्ये सापडल्या होत्या. यापैकी सात मुलींना बारमधील छुप्या खोल्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या खोल्यांसाठी रिमोटचा लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता आणि या खोल्या कुणाला कळू नयेत म्हणून दरवाजावर आरसा बसविण्यात आला होता. तसेच बारमध्ये गैरकृत्येही सुरू असल्याची बाबही कारवाईदरम्यान पथकाच्या निदर्शनास आली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे बार सुरू असतानाही नौपाडा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच या बारवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी याप्रकरणी त्या दिवशी रात्रपाळीला कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक गंगावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.डी. सुरवसे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा