स्वच्छतेचे नियम पायदळी; १३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल
स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवून ग्राहकांना आरोग्यास बाधा पोहचविणाऱ्या ठाणे शहरातील सुमारे ३४३ लहान उपाहारगृहांवर अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी, वर्तकनगर, वागळे इस्टेट अशा विविध भागांमधील ही लहान उपाहारगृहे असून त्यांची नावे लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहेत. या उपाहारगृह चालकांकडून १३ लाख ५० हजार ५२८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर १८१ उपाहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यापैकी चार मोठय़ा उपाहारगृहांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये लहान उपाहारगृहे आहेत. भाजीपोळी, मिसळ-पाव, वडा, इडली असे जिन्नस विकणाऱ्या या उपाहारगृहांमध्ये मोठी गर्दीही असते. गेल्या काही महिन्यांपासून येथील स्वच्छतेची अन्न व औषध प्रतिबंधक विभागाने नियमित तपासणी सुरू केली असून, या मोहिमेत या विभागाला धक्कादायक चित्र पाहायला मिळाले आहे. यापैकी बहुतांश उपाहारगृहांमध्ये अन्न ज्याठिकाणी शिजवले जाते किंवा वाढले जाते अशा ठिकाणी अस्वच्छता आढळून आली आहे, अशी माहिती या विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. काही उपाहारगृहांमधील स्वयंपाकगृहात स्वच्छता नसल्यास अन्नामधून पोटात जाणारे जंतू आणि त्यामुळे होणारी रोगराई ही एखाद्या ग्राहकाच्या जिवावरही बेतू शकते. हे टाळण्यासाठी अन्न विभागाकडून काळजी घेतली जाते, असे देशमुख यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात सातत्याने अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपाहारगृह चालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून स्वच्छतेच्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहे. शहरात चार मोठय़ा उपाहारगृहांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
३४३ उपाहारगृहांवर कारवाई
स्वच्छतेचे नियम पायदळी; १३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल
Written by भाग्यश्री प्रधान
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-05-2016 at 00:11 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on restaurants in thane