लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यावर दोन महिन्यापासून कल्याण-तळोजा मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे या रस्त्यावर वाहन कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी शिळफाटा रस्त्यालगतच्या झोपड्या, गॅरेज, टपऱ्या, निवारे पालिकेच्या ई प्रभागाच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केले.

ही कारवाई करताना सोनरापाडा नेकणीपाडा बस थांब्याजवळ मुख्य वर्दळीच्या रस्त्याला खेटून तीन महिन्यापूर्वी एका स्वयंघोषित शिवसेनेच्या कार्यकर्त्याने बांधलेल्या शिवसेना शाखेवर राजकीय दबावातून तोडकाम पथकाने कारवाई न केल्याने स्थानिक नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ही शाखा जमीनदोस्त करावी म्हणून मागील तीन महिन्यांपासून नागरिकांचा पालिकेवर दबाव आहे. पण डोंबिवली पश्चिमेतील एका राजकीय नेता या बांधकामाला अभय देत असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा-डोंबिवली जीमखाना रस्त्यावर पर्यटक बसचे अनधिकृत वाहनतळ, परिसरातील रहिवासी वाहन कोंडीने हैराण

शिळफाटा रस्त्यावर बहुतांशी टपऱ्या, निवारे हे राजकीय आशीर्वादाने बांधण्यात आले आहेत. या माध्यमातून राजकीय मंडळींची दर महिना व्यासायिकांकडून सोय करण्यात येते, असे व्यावसायिक सांगतात. ही बांधकामे आता वाहतुकीला अडथळा ठरू लागल्याने ५० हून अधिक कच्ची बांधकामे तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. या रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेत उभी असलेली १० हून अधिक भंगार स्थितीमधील दुचाकी, मोटार वाहने जप्त करण्यात आली.

ई प्रभागाचे अधिकारी, मानपाडा पोलीस यांच्या एकत्रित सहकार्यातून ही कारवाई करण्यात आली. शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्गाचे काम सुरू होईपर्यंत या रस्त्यावर एकही गॅरेज, टपऱी, गाळे उभारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आणखी वाचा-कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी

शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा अधिक संख्येने गॅरेज आहेत. या गॅरज चालकांची वाहन दुरूस्तीची वाहने रस्त्याच्या बाजुला उभी असतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी सात वर्षापूर्वी ही सर्व गॅरेज जमीनदोस्त केली होती. ती पुन्हा जशीच्या तशी एमआयडीसी, एमएसआरडीसीच्या जागा बळकावून उभारण्यात आली आहेत.