वाय जंक्शनलगतच्या अतिक्रमणांवर कारवाई; चार किमीचा रस्ता ६० मीटर रुंद होणार

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीनंतर आता या मार्गाला जोडणाऱ्या वाय जंक्शन ते कल्याण फाटय़ापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामात अडथळा ठरणाऱ्या खासगी तसेच बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहीम बुधवारी ठाणे महापालिकेने सुरू केली. ही अतिक्रमणे हटवल्यानंतर या पट्टय़ातील चार किमी लांबीचा रस्ता सुमारे ६० मीटर रुंद केला जाणार आहे. त्यामुळे शीळमार्गावर होणारी वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होण्याची चिन्हे आहेत.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, गुजरात, भिवंडी आणि नाशिक या भागांत जाणारी अवजड वाहने वाय जंक्शन ते कल्याण फाटा मार्गावरून जातात. वाय जंक्शन येथून ही वाहने मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून पुढे जातात. परंतु वाय जंक्शन ते कल्याण फाटा हा रस्ता २५ ते ३० मीटर रुंदीचा असून या मार्गावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन मार्गिका आहेत. वाहनांची संख्या मोठी असल्याने या मार्गिका अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते. या भागात गेल्या काही वर्षांत लोकवस्ती वाढली असून नवीन गृहसंकुलेही उभी राहत आहेत. नेमकी ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र, हा रस्ता अरुंद असल्यामुळे पुलांची उभारणी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये वाय जंक्शन ते कल्याण फाटा हा रस्ता येतो. या रस्त्यालगत बांधकामे असून ती रुंदीकरणाच्या कामात अडसर ठरत होती. हा अडथळा दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने येथील १९० कुटूंबांना भाडे तत्वावरील घरांमध्ये स्थलांतरीत केले आहे. या स्थलांतरणाच्या कारवाईनंतर बुधवारपासून येथील बांधकामे तोडण्यास सुरूवात केली आहे. त्यात भारत गिअर कंपनीचाही काही परिसर रुंदीकरणात बाधीत होणार आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी या भागाचा दौरा करून कामाची पाहणी केली. शीळ ते मुंब्रा बाह्यवळण रस्ता रूंद होत नाही, तोवर येथील कोंडी कमी होणार नाही. त्यामुळे रस्त्यालगतच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

शीळ ते मुंब्रा बाह्य़वळण रस्ता रुंद होत नाही तोवर कोंडी सुटणार नाही.  काटई ते ऐरोली भुयारी मार्ग तसेच रस्ते कामात पालिका हद्दीतील जमिनीच्या संपादनाची कार्यवाहीदेखील वेगाने सुरू करण्यात आली आहे. मालकांना टीडीआर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

-संजीव जयस्वाल, ठाणे महापालिका आयुक्त