कल्याण-डोंबिवली परिसरातील खाडी किनाऱ्यांवर रेतीमाफियांकडून बेसुमार रेती उपसा सुरू आहे. या माफियांनी पूल, रेल्वे मार्ग धोक्यात आणण्यास सुरुवात केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कल्याणमधील दुर्गाडी पूल, डोंबिवली रेतीबंदर, कोपर खाडीकिनारी बेकायदा रेती उपसा करणाऱ्या २१ क्रेन, दोन रेती उपसा करणाऱ्या सक्शन पंपांना सील ठोकण्यात आले. या ठिकाणांहून दहा लाखांची रेती जप्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, प्रांत अधिकारी धनंजय सावळकर, तहसीलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागातील स्थानिक तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना हा रेती उपसा माहीत असतो. या कर्मचाऱ्यांचे रेती माफियांशी साटेलोटे असल्याने हे कर्मचारी वरिष्ठांना माहिती देत नाहीत. वरिष्ठांकडे या विषयाच्या तक्रारी गेल्या की मग कारवाई होते, असे महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader