डोंबिवली- डोंबिवली पूर्व ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी पदपथ, वर्दळीचे रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर तीन दिवसांपासून आक्रमक कारवाई सुरू केली आहे. रस्ते अडवून वाहन दुरुस्ती कार्यशाळा चालविणे, पदपथावर हातगाड्या लावणे, पदपथावर निवारे उभारे उभारुन व्यवसाय करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे.डोंबिवलीत टाटा लाईन खाली कस्तुरी प्लाझा इमारतीच्या पाठीमागील बाजुला अनंत स्मृती सोसायटीच्या तळ मजल्याला वर्दळीच्या रस्त्यावर तीन ते चार वाहन दुरुस्तीच्या कार्यशाळा (गॅरेज) आहेत. इतर दुकाने आहेत. या दुकानांचे मालक पदपथावर निवारे उभारुन रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने वाहन दुरुस्तीची कामे अनेक वर्ष करत आहेत. या दुकानांच्या विरुध्द स्थानिक रहिवाशांनी अनेक तक्रारी पालिका, वाहतूक, पोलिसांकडे यापूर्वी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते, पदपथ मोकळे असले पाहिेजेत म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांचे सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश आहेत. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत, फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी या चार कार्यशाळा चालकांसह इतर १२ दुकानदारांना पदपथावरील निवारे स्वताहून काढून टाकण्याच्या, गॅरेज बंद करण्याच्या नोटिसा दिल्या. तरीही मुदतीत त्यांनी निवारे न काढल्याने साहाय्यक आयुक्त कुमावत, पथक प्रमुख साळुंखे यांच्यासह २७ कामगारांनी बुधवारी पोलीस बंदोबस्तात कार्यशाळा चालकांचे निवारे तोडून टाकले. रस्त्यावरील वाहन दुरुस्तीची सर्व वाहने हटविली. या कारवाईने टाटा लाईन परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा >>>ठाण्यातील टेकडी बंगला, हाजुरी भागातही क्लस्टर योजनेची अंमलबजावणी; ‘या’ शासकीय संस्थेबरोबर पालिकेने केला करार

केळकर रस्ता, शिवमंदिर, दत्तनगर, राजाजी रस्ता भागातील पदपथांवरील निवाऱे तोडून टाकण्यात आले. रस्ते, कोपऱ्यांच्या आडोशाला उभ्या केलेल्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. काही हातगाड्यांची जागीच तोडमोड करण्यात आली. या कारवाया करताना व्यापाऱ्यांनी अनेक ठिकाणी विरोध केला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पालिका पथकांनी जेसीबीच्या साहाय्याने आक्रमक कारवाई केली. मागील अनेक वर्षाच्या काळात प्रथमच ग प्रभाग हद्दीत दुकान मालक, कार्यशाळा चालकांविरुध्द कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा >>>नितीन देसाईंनी इतक्या टोकाचे पाऊल उचलले यावर विश्वास बसत नाही – कलादिग्दर्शक संजय धबडे

टाटा लाईनखालील कार्यशाळा दुकान मालकांनी पुन्हा निवारे तयार करुन वाहन दुरुस्ती रस्त्यावर सुरू केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांच्या परवानगीने घेण्यात येईल, असे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले. प्रभागात एकही दिवसा-रात्री खाद्यपदार्थाची हातगाडी सुरू राहणार नाही असे नियोजन केले आहे. चोरुन लपून कोणी असा व्यवसाय केला तर त्याची हातगाडी जागीच तोडून टाकण्याचा आणि गाडी चालकावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कुमावत यांनी सांगितले.

“ ग प्रभाग हद्दीतील पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या दुकान मालक, कार्यशाळा चालकांवर कारवाई करण्यात आली. ग प्रभागात हद्दीत एकही खादयपदार्थ हातगाडी चालक, पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करणार नाही असे नियोजन केले आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.”- संजय कुमावत,साहाय्यक आयुक्त,ग प्रभाग, डोंबिवली.

(डोंबिवलीत टाटा लाईनखालील वाहन दुरुस्ती कार्यशाळांवर कारवाई.)