दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात विनापरवाना फटाक्यांचा साठा करणे एका व्यापाऱ्याला महागात पडले आहे. कोणत्याही अनुज्ञप्तीशिवाय अमरजीत राजवाणी आणि हरेश राजवानी या दोघांनी सुमारे ४३ लाख २७ हजार रूपयांचे विविध प्रकारचे फटाके उल्हासनगरच्या सर्वाधिक वर्दळीच्या अशा कॅम्प दोन भागात साठवून ठेवले होते. याची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी या ठिकाणी ध़डक देत दोन्ही व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर शहरात सणांच्या निमित्ताने अनेक फटाक्यांची दुकाने सुरू केली जातात. मात्र परवानगी आणि इतर खबरदारी न घेतल्याने अपघात होण्याची भीती असते.
उल्हासनगर शहरातील बाजारपेठ ठाणे, रायगड आणि मुंबईतील अनेक उपनगरीय शहरांमधल्या ग्राहकांना आकर्षीत करत असते. सण, उत्सवाच्या निमित्ताने चांगल्या आणि स्वस्त दरात उल्हासनगरात वस्तू उपलब्ध होत असतात. घाऊक बाजारातील दरही परवडणारा असल्याने ग्राहक आणि व्यापारी उल्हासनगर शहरात येतात. त्यामुळे सण, उत्सवाप्रमाणे उल्हासनगरच्या बाजारपेठा बदलत असतात. सध्या घटस्थापना दसरा आणि दिवाळ्याची तयारी बाजारपेठांमध्ये सुरू आहे. उल्हासनगर शहरात अनेक व्यापारी घाऊक दरात फटाक्यांची विक्री करत असतात. या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा शहरात केला जातो. मात्र या फटाक्यांचा साठा करत असताना नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : अंबरनाथ : रिव्हर्स घेताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस उलटली आणि…
उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागात नेहरू चौक परिसरात युनिव्हर्सल ट्रेडर्स या दुकानात अमरजीत राजवलानी आणि हरेश राजवानी या दोघांनी विविध प्रकारचे, आकाराचे सुमारे ४३ लाख २७ हजार रूपयांचे फटाके साठा करून ठेवले. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना याबाबत तपासणी केली असता या व्यापाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची अनुज्ञप्ती किंवा परवाना आढळला नाही. या प्रकारामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने उल्हासनगर पोलिसांनी या दोन्ही व्यापाऱ्यांविरूद्ध स्फोटक विषयक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामुळे शहरातील बेकायदा पद्धतीने फटाके विक्री आणि साठा करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
अपघातापूर्वी कारवाईची गरज
अनेक लहान विक्रेते उल्हासनगरातील मोठ्या घाऊक फटाके विक्रेत्यांकडून फटाके विकत घेऊन सण उत्सवांच्या तोंडावर फटाके विक्रीचा व्यवसाय सुरू करतात. हे करत असताना कोणताही परवानाही घेतला जात नाही, असे दिसून आले आहे. त्याचवेळी सुरक्षा विषयक खबरदारीही घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. अशावेळी पालिका आणि पोलिसांनी अशा दुकानदारांवर वेळीच कारवाई करण्याची मागणी होते आहे. उल्हासनगर शहरात उत्सवकाळात लाखो ग्राहक आणि व्यापारी येजा करत असतात. त्यामुळे यावर अधिक लक्ष देण्याची मागणी होते आहे.