ठाणे : नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला अनेकजण मद्य पिऊन वाहन चालवितात. या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतुक पोलिसांनी ३११ मद्यपी वाहन चालकांविरोधात आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या ५८ सह प्रवाशांविरोधात कारवाई केली आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ही कारवाई करण्यात आली आहे.
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठ्याप्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले होते. त्यामुळे मंगळवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील विविध भागात ढाबे, हाॅटेल आणि फार्म हाऊसमध्ये पार्ट्यांसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पार्टी केल्यानंतर अनेकजण मद्य पिऊन वाहने चालवितात. या प्रकारामुळे अपघाताची भिती निर्माण होत असते. तसेच मद्यपी वाहन चालकांसोबत सह प्रवासी देखील असतात. या घटनेत मद्यपी वाहन चालकामुळे इतर प्रवाशांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मुख्य चौकांमध्ये वाहन चालकांची तपासणी केली होती. या कारवाईत ३११ वाहन चालक हे मद्य पिऊन वाहने चालवित असल्याचे आढळून आले. या वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या ५८ सह प्रवाशांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वाधिक मद्यपी वाहन चालकांविरोधात ठाणे आणि कल्याण शहरात करण्यात आली.
हेही वाचा >>>डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा
मद्यपी वाहन चालकांवरील कारवाई
ठाणे ते दिवा – १२०
भिवंडी – ६०
डोंबिवली-कल्याण- ७०
उल्हासनगर ते बदलापूर – ६१
एकूण – ३११