कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांत अती वेगाने दुचाकी चालविणाऱ्या, दुचाकीवर तीन ते चार जण बसून प्रवास करणाऱ्या १५० हून अधिक तरुणांवर गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी रात्रीच्या वेळेत दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा दुचाकीस्वारांनी धसका घेतला आहे.
रात्री दहा वाजल्यानंतर ते मध्यरात्रीच्या वेळेत काही तरुण दुचाकीस्वार आपल्या महागड्या, स्पोर्ट्स, अती वेगाच्या दुचाकी रस्त्यावर काढून कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांत विशेषकरून ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता, कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्ता, कल्याण पूर्व पुना जोड रस्ता, गांधारे पूल ते पडघा रस्ता, टिटवाळा ते वाडेघर बाह्यवळण रस्ता, मोठागाव माणकोली रस्ता, फडके रस्ता भागात सुसाट वेगाने आपल्या दुचाकी चालवितात. ही वाहने चालविताना धडकी भरेल असे आवाज वाहनाच्या माध्यमातून काढतात.
या वेगवान दुचाकी रस्त्याने फिरवत असताना दुचाकीस्वार वाहनातील तांत्रिकतेचा गैरफायदा घेत वाहनातून विविध प्रकारचे जोराचे आवाज काढतात. रात्रीच्या वेळेत हे प्रकार घडत असल्याने शांततेचा भंग होतो. नागरिकांची झोप मोड होते. लहान बाळ, वृद्ध, हृदयरोगी यांना या मोठ्या आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो. संबंधित रस्ते भागातील नागरिक या रोजच्या आवाजाने त्रस्त आहेत.
कल्याण, डोंबिवली शहरात रात्रीच्या वेळेत अति वेगवान दुचाकीस्वारांचा उपद्रव असल्याने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अशा वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यांना दिले आहेत. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत स्थानिक पोलिसांनी शहराच्या विविध भागांत रात्रीच्या वेळेत अति वेगाने दुचाकी चालविणाऱ्या १५० तरुण चालकांवर कारवाई केली. अशा चालकांना पकडून पहिले १०० उठाबशा काढण्याची आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईनंतर पुन्हा दुचाकीस्वार असे कृत्य करताना आढळला तर त्याला फौजदारी कारवाई करण्याची तंबी दिली जाते.
काही जण एका दुचाकीवर तीन ते चार जण बसून हातवारे करत, मोठ्याने गाणी बोलत रात्रीच्या वेळेत शहराच्या येरझऱ्या मारतात. अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अशाप्रकारचे मौज करणारे बहुतांशी तरुण अल्पवयीन असल्याचे पोलिसांना आढळले आहे. अशा मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली जात आहे.
तळीराम कारवाई
रविवारी रात्री कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांत पोलिसांनी झाडे, झुडपांचा आधार घेऊन मद्य, गांजा, इतर अंमली पदार्थांची तस्कारी आणि सेवन करणाऱ्या सुमारे ६० ते ७० जणांवर कारवाई केली. कल्याण पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसर हा अंमली पदार्थ विक्री आणि गांजा सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनला होता. या भागात स्थानिक पोलिसांनी दररोज कारवाई सुरू केली आहे.