बदलापूरः दोन महिन्यांपूर्वी बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिम भागात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई केली होती. या कारवाईत रस्ते, पदपथ अडवणाऱ्या विक्रेते, दुकानदार, भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई केली होती. आता पालिका प्रशासनाने कर्जत बदलापूर राज्यमार्गावर असलेल्या आरक्षित जागांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. येत्या काळात शहरातील आरक्षित भूखंड मोकळे करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली होती. सातत्याने कारवाई होत नसल्याने भाजी विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते, दुकानदार यांची मुजोरी वाढली होती. नागरिकांना चालण्यासाठी पदपथही शिल्लक नव्हते. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी शहरातील अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी धडक मोहिम हाती घेतली होती. सुरूवातीला शहराच्या प्रमुख रस्त्यांवर कारवाई केल्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरही कारवाई केली. सलग पाच दिवस चाललेल्या या कारवाईमुळे शहरात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. दिवसा होणाऱ्या कारवाईनंतर अनेकदा रात्रीच्या वेळी पदपथ आणि रस्ते गिंळंकृत केले जात होते. गायकवाड यांनी रात्रीच्या सुमारासही बाजारपेठ परिसरात कारवाई करत फेरिवाल्यांना दणका दिला होता.

या कारवाईनंतर बुधवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात केली आहे. बुधवारी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी कर्जत बदलापूर राज्यमार्गावर कात्रप पेट्रोल पंपाशेजारचे आरक्षित जागेवरचे अतिक्रमण हटवले. या कारवाईवेळी दुकाने जमिनदोस्त करण्यात आली. या जागेवर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे उद्यानाचे आरक्षण होते. तसेच शेजारून जाणाऱ्या नाल्याला बंदिस्त करून शेजारील जागेवर स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे.

आरक्षित भुखंड मोकळे करण्याचे उद्दिष्ट

कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात आऱक्षित भुखंड आहेत. त्यातील अनेक आरक्षित भुखंडांवर सध्या अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने आता या आरक्षित भुखंडांवरील अतिक्रमणांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. बुधवारी कारवाई करत असताना पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दुकानदारांना साहित्य काढण्यासाठी वेळ दिला. त्यामुळे दुकानदारांचे काही अंशी नुकसान होण्यापासून वाचले.

सायंकाळची कारवाई वाढवा

बदलापूर शहरात सायंकाळच्या सुमारास मध्यवर्ती चौक, रस्त्यांवर फेरिवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या उभ्या केल्या जातात. या गाड्यांमुळे ग्राहक जमून परिसरात कोंडी होते. बाजारपेठ परिसरात अजुनही काही भाजी विक्रेते पदपथ आणि रस्त्यावर भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे रात्री स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागतो. त्या पदपथ अडवणाऱ्यांवर पालिकेने काही वेळा अशी कारवाई केली. मात्र ती कारवाई सातत्याने करण्याची मागणी आता होते आहे.