लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : टिटवाळा, बल्याणी परिसरातील फेरीवाल्यांवर पालिकेच्या अ प्रभागातील फेरीवाला हटाव नियंत्रण पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईने रस्ते, पदपथ अडवून बसणारे विक्रेते, फेरीवाले यांना लक्ष्य केले. पदपथांवर अनेक महिने ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांचे ठेले, निवारे, मंच जेसीबीच्या साहाय्याने पथकाने तोडून टाकले.
पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते, पदपथ सुस्थितीत असले पाहिजेत. रस्ते, पदपथ नागरिकांना चालण्यासाठी सुस्थितीत राहतील यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. या आदेशाप्रमाणे अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी सुट्टीचा दिवस असुनही अचानक टिटवाळा, बल्याणी भागातील पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या भाजीपाला, फळ, उसाचे चरखे, घरगुती वस्तु विक्री करणाऱ्यांचे ठेले जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.
शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त पालिकेला सुट्टी आहे. आता कोणीही कारवाईला येणार नाही म्हणून फेरीवाले, विक्रेते यांनी नेहमीप्रमाणे टिटवाळा, बल्याणी भागातील पदपथ, रस्ते, चौकांच्या कडेला आपले व्यवसाय सुरू केले होते. पालिकेकडून कारवाई होत नाही असा विचार करून बहुतांशी विक्रेत्यांनी पदपथावर प्लास्टिक, पत्रे यांचे निवारे उभे केले होते. काहींनी रस्त्याच्या कडेला दगड विटा लावून ठेले तयार केले होते. कडक उन्हाचे दिवस असल्याने रस्तोरस्ती हातगाडी, मंचावर उसाचे चरखे लावून पदपथ, रस्त्यांवर काहींनी उस रसाची गुऱ्हाळ सुरू केली होती.
या फेरीवाले, विक्रेत्यांमुळे नागरिकांना रस्ते, पदपथावर चालणे मुश्किल झाले होते. वाहन चालकांना फेरीवाले बसत असलेल्या रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले होते. त्यामुळे टिटवाळा, मांडा, बल्याणी भागात नेहमी वाहतूक कोंडी होत होती. याविषयीच्या तक्रारी अ प्रभागात वाढल्या होत्या.
पावसाळ्यापूर्वी टिटवाळा, मांडा, बल्याणी, बनेली, श्री गणपती मंदिर मार्ग परिसरातील फेरीवाले हटविण्याचे नियोजन साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी केले आहे. या कामाची सुरूवात शुक्रवारी सकाळी टिटवाळा, बल्याणी भागातून करण्यात आली. अचानक कारवाई सुरू झाल्याने फेरीवाल्यांची पळापळ झाली. फेरीवाला हटाव पथकांनी फेरीवाले, विक्रेते यांचे सामान जप्त केले. त्यांच्या हातगाड्यांचा जागीच जेसीबीच्या साहाय्याने चुरा केला. उसाचे चरखे, अवजड मंच पथकाने जप्त केले. या कारवाईने नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.
टिटवाळा भागात मागील अडीच महिन्यात बेकायदा बांधकामांविरुध्द प्रभावी मोहीम राबवली. त्यामुळे बेकायदा बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे आता रस्ते, पदपथ, चौक अडवून बसणाऱ्या फेरीवाले, विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. ही मोहीम टिटवाळा, आंबिवली, बल्याणी, बनेली, मुख्य, अंतर्गत रस्त्यांवर दररोज राबविण्यात येणार आहे. -प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, टिटवाळा.