डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील हरितपट्ट्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या बेकायदा बांधकाम परवानग्या बनवून, त्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाचा रेरा नोंदणी क्रमांक मिळवून १० बेकायदा इमारतींची उभारणी करणाऱ्या भूमाफियांच्या बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई मंगळवारी पालिकेने सुरू केली. या कारवाईने पालिकेने माफियांना मोठा दणका दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- शहापूर जवळील किन्हवली गावात प्रयोगशील शेतकऱ्याकडून सेंद्रीय शेतीचे प्रयोग, भात, भाजीपाला लागवडीचे पथदर्शी प्रयोग यशस्वी

मंगळवारी सकाळी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी आपल्या पथकाच्या साहाय्याने ही तोडकामाची कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमी, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा- ठाण्यातील रस्त्यालगत राडारोड्याचे ढिग कायम ; आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित विभागाचे दुर्लक्ष 

ही बेकायदा बांधकामे तुटू नयेत म्हणून भूमाफिया मे. निर्माण होम्सचे मनोज सखाराम भोईर, मे. आदित्य इन्फ्राचे प्रफुल्ल गोरे, आदेश बिल्डर्सचे सिध्देश प्रदीप कीर, सिकंदर निळकंठ नंदयाल, कुलदीप रामकिसन चोप्रा, लारा या भूमाफियांनी लोकप्रतिनिधी, नेते, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ही बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांना दारात कोणीही उभे केले नाही. याऊलट आपण केलेली कृती नियमबाह्य. तुमच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा सज्जड दम एका लोकप्रतिनिधीने या भूमाफियांना दिला. गोरे, भोईर, कीर, नंदयाल, चोप्रा, नारकर या माफियांनी चार हजार चौरस मीटरच्या हरितपट्ट्यात १० बेकायदा इमारती उभारणीची कामे सुरू केली आहेत.

हेही वाचा- कंत्राटदारांच्या वादात कल्याण – नगर महामार्गाची सुरक्षा वाऱ्यावर

‘लोकसत्ता’ ठाणे सहदैनिकाने या संबंधीचे वृत्त (८ फेब्रुवारी) देताच पालिकेसह शासकीय यंत्रणा खडबडून जागे झाल्या. डोंबिवलीतील महत्वपूर्ण हरितपट्टा माफियांना हडप करत आहेत समजल्यावर महसूल, पालिका, सागरी मंडळ, महावितरणचे अधिकारी घटनास्थळाचा आढावा घेऊन गेले. या बांधकामाचे तक्रारी करणारे, वृत्त छापणाऱ्यांचा बदला घेण्याची भाषा त्यानंतर माफियांकडून सुरू करण्यात आली होती.

इमारती जमीनदोस्त करणार

ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त गुप्ते, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पालिकेच्या ५० हून अधिक तोडकाम पथकासह मंगळवारी सकाळी कुंभारखाणपाडा खाडी किनारी दाखल झाले. १० इमारतींच्या ठिकाणी जाण्यास पोहच रस्ता नसता त्याठिकाणी इमारती उभारणीची कामे सुरू पाहून पोलीस हैराण झाले. या जागेवर पोकलेने, जेसीबी येण्यास जागा नसल्याने पाच हून अधिक ब्रेकरच्या साहाय्याने छताचे स्लॅब तोडण्याची कामे सुरू करण्यात आली. इमारतींच्या भिंती घणांनी तोडण्यात आल्या. नवीन बांधकामांचे खांब तोडून टाकण्यात आले. इमारतींवर कारवाई केल्यानंतर त्यात अडथळा आणला तर भूमाफियांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा साहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी दिला होता. त्यामुळे माफिया कारवाई सुरू झाल्यानंतर पुढे आले नाहीत. या भागातील दोन बेकायदा इमारतींमध्ये काही रहिवासी राहण्यास आले आहेत. १० इमारती अधिकाधिक तोडकाम करुन या भागात रस्ता केल्यानंतर जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने या इमारती जमीनदोस्त केल्या जातील, असे गुप्ते यांनी सांगितले.

हेही वाचा- “नव उद्योजकांना दिशा देण्यासाठी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क’सारख्या संस्थांची गरज”; उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

महावितरण अधिकाऱ्यांकडून पाहणी

या बेकायदा इमारतींना महावितरणकडून वीज पुरवठा देण्यात आला आहे. तो कशाप्रकारे, कोठून देण्यात आला आहे याची चाचपणी करण्यासाठी महावितरणचे डोंबिवली विभागाचे अधिकारी मंगळवारी घटनास्थळी आले होते. आता ते या भागातील वीज पुरवठ्यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- कळव्यातील आमदार निधीच्या कामांचे एलईडी फलक काढले; सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आमदार आव्हाड यांचा आरोप

“कुंभारखाणपाड्यातील बेकायदा इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाच ब्रेकर, घण, पहार यांचा वापर करुन या इमारती तोडल्या जात आहेत. या भागात वाहन येण्यासाठी रस्ता केल्यानंतर जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने या इमारती जमीनदोस्त केल्या जातील, अशी माहिती ह प्रभाग सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिली.


Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against illegal constructions in kumbharkhanpada green belt in dombivli dpj