डोंबिवली – येथील पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारच्या ४४ एकरच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी खाडी किनारा बुजवून बेकायदा चाळी उभारल्या आहेत. खारफुटीची झाडे तोडून, खाडीत भराव टाकून ही बांधकामे केल्याने ह प्रभाग अधिकाऱ्यांनी या भागातील नव्याने उभ्या राहिलेल्या सर्व चाळी जमीनदोस्त केल्या.
देवीचापाडा येथील खाडी किनारी खाडी किनारा बुजवून, खारफुटी तोडून बेकायदा चाळी उभारण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. या वृत्ताची आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांना देवीचापाडा येथील पर्यटन आरक्षण स्थळावरील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – कल्याणमध्ये अटाळी-वडवली भागात अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या १२ जणांना अटक
जैवविविधता
निसर्ग जैवविविधतेचे संरक्षण करणारा एकमेव हरितपट्टा डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, कोपर, मोठागाव भागात शिल्लक आहे. तो पट्टाही भूमाफियांनी हडप करण्यास सुरुवात केल्याने निसर्गप्रेमींमध्ये नाराजी आहे. हिवाळ्यात या भागात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी येतात. ते पाहण्यासाठी निसर्ग, पक्षीप्रेमींची या भागात नेहमीच वर्दळ असते. या भागातील जैवविविधता, पक्षी जीवन आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ज्येष्ठ निसर्ग छायाचित्रकार राजन जोशी, नयन खानोलकर, नवोदित पक्षीप्रेमी अर्णव पटवर्धन या भागात भ्रमंती करत असतात. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले निसर्ग संवर्धनासाठी खाडी किनारी भागात नियमित विविध उपक्रम राबवितात.
कारवाई
ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी खाडी किनारा भागाची पाहणी करून या भागातील खारफुटी तोडून, नैसर्गिक स्त्रोत भराव टाकून बांधण्यात आलेल्या बेकायदा चाळी, नव्याने चाळी उभारणीसाठी बांधलेले ३० जोते जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. या कारवाईच्यावेळी अधीक्षक अरुण पाटील, १० कामगार, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्याने भूमाफिया या भागातून पळून गेले होते. या कारवाईमुळे माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – ठाण्यात श्रमजीवी संघटनेचा मोर्चा
“पर्यटन स्थळ आरक्षणावरील खारफुटी तोडून, नैसर्गिक प्रवाह बंद करून उभारलेल्या बेकायदा चाळी प्रथम तोडण्यात आल्या. पुढील टप्प्यात आरक्षणाच्या इतर भागांवरील पोहच रस्त्यांना बाधित चाळींवर कारवाई केली जाणार आहे.” – सुहास गुप्ते, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.