कल्याण – कल्याण जवळील शहाड भागात अनेक व्यावसायिकांनी रस्ते, पदपथ अडवून निवारे उभे करून तेथे व्यवसाय सुरू केले होते. देढिया महाविद्यालयासमोरील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून तेथे प्लास्टिक, बांबूचे निवारे उभे केले होते. या निवाऱ्यांमुळे या भागातील नागरिकांना, वाहन चालकांना अडथळे येत होते. या बेकायदा निवाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होताच अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी अतिक्रमण नियंत्रण, फेरीवाला हटाव पथकासह जाऊन हे सर्व निवारे जमीनदोस्त केले.

पदपथ, रस्त्यांच्या आडोशाने तात्पुरते निवारे उभे करून तेथे पक्की बांधकामे करण्याची तयारी फेरीवाले, व्यावसायिकांनी सुरू केली होती, असे तोडकाम पथकाच्या निदर्शनास आले. हे निवारे तोडल्यानंतर या भागात पुन्हा रस्ते, पदपथ अडवून निवारे उभे केले तर फौजदारी कारवाई केली जाईल, अशी तंबी साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी येथील व्यावसायिकांना दिली आहे.शहाड परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. महाविद्यालय, शाळा या भागात आहेत. बिर्ला महाविद्यालयाकडे जाणारे बहुतांशी विद्यार्थी शहाड रेल्वे स्थानकातून येजा करतात. याशिवाय या भागात बाजारपेठा आहेत. बाजारपेठांमध्ये सकाळ, संध्याकाळ गर्दी असते. अशा परिस्थितीत शहाड, देढिया महाविद्यालय भागातील मुख्य वर्दळीचे रस्ते, पदपथ अडवून व्यावसायिकांनी बेकायदा निवारे उभे केले होते.

निवाऱ्यांचे तोडलेले साहित्य तोडकाम पथकाने जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. बेकायदा निवारे तोडल्याने या भागातील रस्ते, पदपथ मोकळे झाले आहेत.

टिटवाळ्यात कारवाई

टिटवाळ्यात बाजपेयी चौकात एका शाळेच्या बाजुला एका दुकानदाराने दुकानाचा बेकायदा गाळा उभारणीचे काम सुरू केले होते. हे बांधकाम आडबाजुला असल्याने तेथे कारवाई होणार नाही असे दुकानदाराला वाटले होते. याविषयीच्या तक्रारी प्राप्त होताच अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने हे निर्माणाधिन बांधकाम जमीनदोस्त. गाळेगाव येथे बेकायदा चाळ उभारणीसाठी जोत्यांचे बांधकाम केले जात होते. ही बांधकामेही यावेळी तोडण्यात आली. साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक शशांक गर्ग, अतिक्रमण नियंत्रण पथकाचे राजेंद्र साळुंखे आणि इतर कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

टिटवाळा, मांडा, मोहने, आंबिवली, बल्याणी, शहाड या अ प्रभाग प्रभाग हद्दीत एकही नव्याने बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार प्राप्त होताच, त्याविषयीची खात्री करून ते बांधकाम वरिष्ठांच्या आदेशावरून तोडले जात आहे. – प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग. टिटवाळा.