ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील राजीव गांधी महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षात शिकणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे माजिवाडा येथील वसतीगृहात रॅगिंग केल्याची बाब रँगीग प्रतिबंधक समितीच्या चौकशीत उघड झाली आहे. रॅगिंग करणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना वसतिगृहातून कायमस्वरुपी बेदखल करण्यात आले. शिवाय, एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालयातूनही निलंबन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत शिवसेना हाच मोठा भाऊ; राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे मत

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये राजीव गांधी महाविद्यालय आहे. रुग्णालय इमारतीतच सुरूवातीला वसतीगृह होते. रुग्णालय विस्तारासाठी हे वसतीगृह आता माडिवाडा येथील पालिका इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. याठिकाणी काही विद्यार्थी राहतात. त्यापैकी काही विद्यार्थ्यांंची रॅगिंग करण्यात आल्याची निनावी तक्रार दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाला ईमेलद्वारे सप्टेंबर महिन्यात प्राप्त झाली होती. याप्रकरणी दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाकडून राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांना या ईमेल पाठवून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महाविद्यालयाच्या अधिष्ठात्या डाॅ. बारोट यांनी रँगीग प्रतिबंधक समितीच्या सहाय्याने याप्रकरणाची चौकशी केली. त्यात, प्रथम व द्वितीय वर्षातील एमबीबीएसमध्ये शिकत असलेल्या विदयार्थ्यांनी नव्याने एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वसतिगृहात रॅगिंग केल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा >>> ठाण्यात महाविकास आघाडी आणि पोलिस संघर्ष वाढण्याची चिन्हे; ठाकरे गटाच्या चौकसभांना पोलिसांकडून मनाई

रँगिंग प्रतिबंधक समितीने या संदर्भात कसून चौकशी करून प्रथम व द्वितीय वर्षातील दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. रॅगिंग करणाऱ्या विदयार्थ्यांना वसतिगृहातून कायमस्वरुपी बेदखल करण्यात आले आहे. तसेच, एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालायतून निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्च शिक्षण संस्थांमधील रॅगिंग प्रतिबंधक नियमावली-२००९च्या अधीन राहून करण्यात आली आहे. रँगिग प्रतिबंधक नियमानुसार कारवाई पूर्ण करून तसा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोग, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पाठविण्यात आला.

कोणत्याही प्रकारे रॅगिगसारख्या घटना होऊ नयेत, यासाठी सर्व विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधण्यात येत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा असा कोणी छळ करत असेल तर त्याची तत्काळ तक्रार करण्यात यावी, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे.

डॉ. राकेश बारोट -अधिष्ठाता, राजीव गांधी वैद्यकीय महाविदयालय

वसतिगृहात रॅगिंगसारखा प्रकार होतो ही निंदनीय बाब आहे. याबाबत विहित प्रक्रियेचा अवलंब करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या माध्यमातून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल.

अभिजीत बांगर – आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against nine students of rajiv gandhi college over ragging in hostel zws