लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: पूर्वेतील ग प्रभाग हद्दीतील वर्दळीचा टंडन रस्ता, शिवमंदिर रस्ता, चार रस्ता, आयरे रस्ता, रामनगर भागातील व्यापारी पदपथावर साहित्य ठेऊन पादचाऱ्यांचा रस्ता अडवित असल्याच्या तक्रारी ग प्रभाग अधिकाऱ्यांकडे वाढल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा दुकान मालकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई दोन दिवसांपासून सुरू केली आहे.
पालिका अधिकाऱ्यांकडून केवळ फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. पदपथावर साहित्य ठेवले आणि पादचाऱ्यांची गैरसोय झाली तरी व्यापारी त्याची दखल घेत नव्हते. अनेक वर्ष हा प्रकार ग प्रभागात सुरू होता. राजकीय पाठिंब्यामुळे दुकानदारांवर कारवाई करताना अधिकाऱ्यांना अडथळे येत होते.
पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी आहेत. साहित्य ठेवण्यासाठी नाहीत. पदपथावर साहित्य असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. हे लक्षात आल्यानंतर ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत, फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी १४ कामगारांच्या साहाय्याने गेल्या दोन दिवसांपासून ग प्रभागातील सर्व मुख्य, वर्दळीच्या रस्त्यांवरील व्यापाऱी, वाहन दुरुस्ती कार्यशाळा चालक, हॉटेल व्यावसायिक यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.
चार रस्ता ते शिवमंदिर रस्ता दरम्यान अनेक व्यापारी रस्ता, पदपथ अडवून सायकल विक्री, वाहन दुरुस्तीचे काम करत होते. काही किराणा सामानाची पोती पदपथावर ठेऊन व्यवसाय करत असल्याचे कारवाई पथकाला आढळून आले. संबंधित दुकान मालकाच्या पदपथावरील सुमारे पाच हजाराहून अधिक किमतीच्या सायकली, पदपथावरील साहित्य पथकाने जप्त केले. काही पदपथांवर राजकीय आशीर्वादाने फेरीवाल्यांच्या हातगाड्या उभ्या होत्या. त्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सुरू असताना काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु, साहाय्यक आयुक्त कुमावत, पथक प्रमुख साळुंखे यांनी त्यास दाद दिली नाही. कस्तुरी प्लाझा जवळील अनंत स्मृति तळमजल्यावरील गाळ्यांमधील वाहन दुरुस्ती कार्यशाळांवर कारवाई केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. याठिकाणी नेहमीच वाहन कोंडी होत होती.
आणखी वाचा-कल्याणमध्ये घर जप्तीच्या कारवाईमुळे आत्महत्येचा प्रयत्न
मागील दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत ४० हून अधिक हातगाड्या, पदपथ अडवून ठेवणारे साहित्य जप्त करण्यात आले. पुन्हा पदपथावर साहित्य विक्री करताना आढळले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दुकान मालकांना देण्यात आला आहे, असे पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले.