ठाणे शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वर्षोनुवर्षे उभ्या असलेल्या भंगार वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली असून या मोहिमेत गुरुवारी इटर्निटी ते ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील रस्त्यावरील ११ भंगार वाहने हटविण्यात आली. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- कल्याणमध्ये धावत्या लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा प्रवाशाच्या मारहाणीत मृत्यू
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते गेल्या काही वर्षात रुंद करण्यात आले आहेत. या रस्त्यांवर अनेक भंगार वाहने उभी करण्यात आल्याचे दिसून येते. या वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही बाब ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनाही शहरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान निदर्शनास आली असून त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा भंगार अवस्थेतील वाहने नजरेस पडल्या तर त्या तात्काळ हटविण्याचे निर्देश सर्व विभागाच्या उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या निर्देशानंतर सर्व विभागाच्या उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांनी अशा वाहने हटविण्याची कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरु केली आहे.
वागळे इस्टेटमधील रस्ता क्रमांक १६ आणि २२, कोपरी तसेच इतर भागातील रस्त्यावरील १५ ते १६ भंगार वाहने काही दिवसांपुर्वीच हटविण्यात आलेली असतानाच, त्यापाठोपाठ गुरुवारी इटर्निटी ते ज्ञानसाधना महाविद्यालय परिसरात अशाचप्रकारची कारवाई करण्यात आली. या भागातील रस्त्यांच्या दुतर्फा उभी करण्यात आलेली ११ वाहने क्रेनच्या साहाय्याने हटविण्यात आली असून त्यात चार चाकी गाड्या, दुचाकी, तसेच शववाहिकेचा समावेश आहे. आली. तसेच या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या खाजगी बसगाड्या, हातगाड्याही हटविण्यात आल्या असल्याचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितले. संपूर्ण शहरात वेळोवेळी ही कारवाई सुरू रहावी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तिन्ही परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत.