मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ साखळी उपोषणाची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. ही परवानगी नाकारण्यात आल्याने या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ घोषणाबाजी केली.
हेही वाचा >>> बदलापूर: आमदार किसन कथोरे यांच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची हजेरी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणासाठी बसले आहे. या उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी शनिवारी ठाण्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर साखळी उपोषण करण्याचे ठरविले होते. परंतु या उपोषणाला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. असे असतानाही शुक्रवारी रात्री काही कार्यकर्ते उपोषणाच्या जागेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाच्या परिसरात जमले होते. त्यावेळी वागळे इस्टेट पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर हे कार्यकर्ते निघून गेले.